नवीन सात रुग्ण आढळल्याने जालना जिल्ह्य़ातील करोना बाधितांची एकूण संख्या ५२ झाली आहे. आतापर्यंत यापैकी १० रुग्ण करोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे.

मागील सात दिवसांत म्हणजे १६ मे ते २२ मे दरम्यान जिल्ह्य़ात करोनाबाधितांची वाढ अधिक झाली आहे. एकूण ५१ रुग्णांपैकी ३३ रुग्ण या सात दिवसातील आहेत. त्यानंतर पाच दिवसांत रुग्णसंख्या यापेक्षा दुप्पट झाली.

शासकीय आणि खासगी रुग्णालयातील वैद्यकीय सेवेशी संबंधित असणारांमध्ये करोना संसर्ग आढळल्याने काळजी वाढली आहे. आतापर्यंत आरोग्य सेवेशी संबंधित १४ व्यक्तींना करोना संसर्ग झालेला आहे. त्यामध्ये जालना शहरातील खासगी रुग्णालयातील एका डॉक्टरसह ११ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कोव्हिड विशेष रुग्णालयातील एका डॉक्टरसह परिचारिकेसही करोना विषाणू संसर्ग झाल्याचे आढळले. यापैकी कोव्हिड विशेष रुग्णालयातील महिला डॉक्टर करोनामुक्त झाली आहे.

जिल्ह्य़ात विविध ठिकाणी शुक्रवारी सकाळपर्यंत संस्थात्मक अलगीकरणात असलेल्या व्यक्तींची संख्या ५८९ होती. जिल्ह्य़ात इतर राज्यातून २१८ आणि महाराष्ट्राच्या अन्य जिल्ह्य़ातून ८ हजार ५३३ व्यक्ती आलेल्या असून त्यांचे स्वतच्या घरातच अलगीकरण करण्यात आलेले आहे.

जिल्ह्य़ात आतापर्यंत १ हजार ६२८ व्यक्तींच्या घशातील स्रावांच्या नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेतून नकारात्मक आला आहे. तर ५१ व्यक्ती करोनाबाधित आढळल्या आहेत.

न्यायालयांमध्ये खबरदारी

करोना विषाणू संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर जिल्ह्य़ातील सर्व न्यायालयांमध्ये अंतर्गत कामकाजाशी संबंधित असणाऱ्यांशिवाय इतरांना प्रवेश देण्यात येणार नाही. वकील, पक्षकार यांची उपस्थिती संबंधित कामाच्या दृष्टीने आवश्यक आहे किंवा नाही याची तपासणी न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच करण्यात येणार आहे. वकील किंवा पक्षकारास विनाकारण परिसरात थांबता येणार नाही. न्यायालयाचा परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असल्याने यासंदर्भात सूचनांचे उल्लंघन करणारांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. के. केवले यांनी यासंदर्भात परिपत्रक काढले. त्यातील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा वकील संघाने केले आहे, असे सदस्य अरविंद मुरमे यांनी सांगितले.