भाजप आमदार गोविंद राठोड यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी सरासरी ५५ टक्के मतदान झाले. या निवडणुकीने राठोड-बेटमोगरेकर या प्रतिस्पध्र्याचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रामध्ये बंद झाले.
विधानसभा निवडणुकीत मुखेडमध्ये एकाकी लढत झाली होती. गोिवद राठोड यांनी तत्कालीन आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर यांना पराभवाची धूळ चारली होती. गोिवद राठोड यांनी मोठय़ा फरकाने विजय मिळवत नांदेड जिल्ह्यात ‘कमळ’ फुलवले होते. आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच मुंबईला जाताना आमदार राठोड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. राठोड यांच्या निधनाने रिक्त झालेल्या मुखेड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले.
भाजपने राठोड यांचे धाकटे चिरंजीव डॉ. तुषार यांना उमेदवारी दिली, तर काँग्रेसने माजी आमदार हनमंत पाटील बेटमोगरेकर यांनाच िरगणात उतरवले. शेवटच्या टप्प्यात भाजपकडून मुख्यमंत्र्यांसह डझनभर मंत्र्यांनी प्रचारयंत्रणा राबवली, तर बेटमोगरेकर यांच्यासाठी खासदार अशोक चव्हाण व काँग्रेसचे अनेक माजी मंत्री मतदारसंघाच्या वेगवेगळय़ा भागांत फिरले. सकाळी ८ वाजता प्रचंड पेलीस बंदोबस्तात मतदानाला प्रारंभ झाला. सुरुवातीला मतदारांमध्ये निरुत्साह होता. दुपारी दोनपर्यंत केवळ २० टक्के, तर चापर्यंत ४८ टक्के मतदानाची नोंद झाली.