वाडा तालुक्यातील  ५५ गावे भातखरेदी केंद्रापासून वंचित

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा : भिवंडी ग्रामीण मतदारसंघात  वाडा तालुक्यातील कुडूस, नेहरोली परिसरातील ५५ गावे येतात. या गावांत भात खरेदी केंद्र नाही.  त्यामुळे या गावातील ७५०० शेतकऱ्यांना आपल्या भात विक्रीसाठी १५ किलोमीटरची पायपीट करून शहापूर, विक्रमगड मतदारसंघातील भातखरेदी केंद्रावर जाण्याची वेळ आली आहे.

वाडा तालुका भिवंडी ग्रामीण, शहापूर व विक्रमगड या तीन विधानसभा मतदारसंघात विभागला गेला आहे. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे नेतृत्व शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे, शहापूर  राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा तर विक्रमगडचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील भुसारा  हे नेतृत्व करीत आहेत. शहापूर मतदारसंघात आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून वाडा तालुक्यातील  १६८ गावांत परळी, गारगांव, मानिवली, कळंभे व खैरे-आंबिवली पाच ठिकाणी  भात खरेदी केंद्र सुरू आहेत. तर विक्रमगड मतदारसंघात वाडय़ातील पोशेरी, गोऱ्हे, गुहिर व खानिवलीत केंद्र सुरू आहेत. मात्र  वाडा तालुक्यातील भिवंडी ग्रामीण मतदारसंघात येणाऱ्या ५५ गावांसाठी मध्यवर्ती ठिकाणी असे एकही भात खरेदी केंद्र नाही. येथील साडेसात हजार शेतकऱ्यांवर भात विक्रीसाठी दहा ते पंधरा किलोमीटर लांब अंतरावरील अन्य मतदारसंघांतील केंद्रांवर धाव घ्यावी लागत आहे. राष्ट्रवादीचे आमदार  दौलत दरोडा व सुनील भुसारा यांनी आपल्या मतदारसंघातील विविध गावांमध्ये भात खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र भिवंडी ग्रामीण मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार शांताराम मोरे यांना वाडा तालुक्यातील निम्मे गावे (७१ मतदान केंद्रे) आपल्या मतदारसंघात असतानाही एकाही गावात भात खरेदी केंद्र सुरू करता न आल्याने येथील शेतकरी संताप व्यक्त करीत आहेत.

शहापूर, विक्रमगड केंद्राचा आधार

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात येत असलेल्या वाडा तालुक्यातील डाकिवली, चांबळे, कुडूस, चिंचघर, खुपरी आदी गावांतील शेतकऱ्यांना १२ ते १५ किलोमीटर लांब असलेल्या शहापूर मतदार संघातील खैरे-आंबिवली या केंद्रावर भात विक्रीसाठी घेऊन जावे लागते. तर निंबवली, केळठण, डोंगस्ते, देवघर इत्यादी गावातील शेतकऱ्यांना दहा किलोमीटर लांब अंतरावरील विक्रमगड मतदारसंघातील खानिवली येथील केंद्रावर तर गांध्रे, ऐनशेत, वाडा इत्यादी गावांतील शेतकऱ्यांना शहापूर मतदारसंघातील मानिवली केंद्रावर  जावे लागते.

येथील शेतकऱ्यांना सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यात येथील लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे हे उदाहरण आहे.

प्रफुल्ल  पाटील, शेतकरी, देवघर, ता.वाडा.

कुडूस परिसरातील सेवा सहकारी संस्थांनी भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केल्यास केंद्र सुरू करण्यात येईल.

राजेंद्र पवार, उप प्रादेशिक व्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ जव्हार.