जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत २ संचालकांची बिनविरोध निवड झाली असून अन्य १९ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात उरल्याने निवडणूक अटळ ठरली आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील व माजी मंत्री मदन पाटील या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी एकत्र आले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादीसह भाजप, शिवसेना एकत्र आले असून काँग्रेस अंतर्गत डॉ. पतंगराव कदम गट एकाकी पडला आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलमध्ये प्रस्थापितांचाच भरणा अधिक आहे.
 काल रात्रीपासून उमेदवार निश्चितीसाठी वाटाघाटी सुरू असताना काँग्रेसला किती जागा सोडायच्या आणि भाजपा व शिवसेनेला किती द्यायच्या यावरून पक्षविरहीत पॅनेलचे भवितव्य अधांतरी होते. जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनेलचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांची शिराळा व वस्त्रोद्योग महामंडळाचे दिलीप पाटील यांची वाळवा तालुका सोसायटी गटातून बिनविरोध निवड झाली आहे. सोसायटी गटातून अन्य तालुक्यातून २० उमेदवारांचे उमेदवारी अर्ज राहिले असल्याने याठिकाणी निवडणूक होत आहे. तसेच आरक्षित असणाऱ्या महिला वर्गात ४, अनुसूचित जाती-जमाती गटातून ६, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून २, विमुक्त जाती-जमाती गटातून २ अर्ज रिंगणात राहिले आहेत. क वर्ग एकमध्ये २ वर्ग २, वर्ग ३ मध्ये ८ आणि वर्ग ४ मध्ये ११ उमेदवार उरले आहेत. त्यामुळे याठिकाणीही लढत होत आहे.
शेतकरी पॅनेलमधून मिरज तालुक्यातून मदन पाटील, आटपाडीमधून उदयसिंग देशमुख, खानापूरमधून आ. अनिल बाबर, जतमधून अनिल मिहद, पलूसमधून सतीश पवार, आणि कवठे महांकाळमधून गणपती सगरे यांना संधी देण्यात आली आहे. याशिवाय क गटातून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, आर. आर. आबांचे बंधू सुरेश पाटील, बी. के. पाटील, खा. संजयकाका पाटील, संग्राम देशमुख, विष्णू माने, बाळासाहेब व्होनमोरे आणि चंद्रकांत हाक्के यांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान, पक्षविरहीत पॅनेलमधून काँग्रेसमधील डॉ. पतंगराव कदम गटाला पूर्णपणे डावलण्यात आले आहे. तालुका सोसायटी गटातून प्रत्येक तालुक्यासाठी एक जागा असून वाळवा व शिराळा वगळता अन्य ८ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये तालुका व उमेदवार पुढीलप्रमाणे आटपाडी २, खानापूर २, जत ३, तासगाव २, मिरज ३, पलूस २, कडेगाव २ आणि कवठे महांकाळ ११ असे उमेदवार रिंगणात आहेत.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना आम्हाला फसविले असल्याचे सांगत जिल्ह्यात गद्दारीचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. लबाडीचे राजकारण करीत एकीकडे आम्हाला चच्रेत गुंतवून ठेवीत घातकी राजकीय खेळी केल्याचा आरोप त्यांनी केला. आमची दिशाभूल करीत फसवे राजकारण राष्ट्रवादीने केले असल्याचा आरोप त्यांनी केला.