लोकसत्ता प्रतिनिधी

अकोला : जिल्ह्यात करोना रुग्णवाढ थांबण्याचे नाव घेत नसून, जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्येने शनिवारी चौदाशेचा टप्पा ओलांडला. ५७ नव्या रुग्णांचे अहवाल सकारात्मक आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १४२१ झाली. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ७४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

अकोला जिल्ह्यात करोना रुग्ण वाढीचा झपाटा सुरूच आहे. सुदैवाने गेल्या दोन दिवसांत मृत्यूची नोंद झाली नाही. मात्र, करोना संसर्ग पसरण्याच्या वेगावर अद्याापही नियंत्रण मिळवता आले नाही. जिल्ह्यातील एकूण २७० तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी २१३ अहवाल नकारात्मक, तर ५७ अहवाल सकारात्मक आले आहेत. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या १४२१ वर पोहचली आहे. सध्या ३०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १०४७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

आज सकाळच्या अहवालात ४२ जणांचे अहवाल सकारात्मक आलेत. त्यात १९ महिला व २३ पुरुष आहेत. त्यामध्ये हरिहरपेठ येथील सहा, अकोट फैल येथील पाच, पातूर समर्थनगर येथील चार, न्यू राधाकिसन प्लॉट, सिंधी कॅम्प, आंबेडकर नगर येथील प्रत्येकी तीन, डाबकी रोड येथील दोन तर आदर्श कॉलनी, सोनटक्के प्लॉट, बाळापूर रोड, कौलखेड, गंगानगर, गीतानगर, शिवर, शिवसेना वसाहत, गुलजारपुरा, कमलानगर, पोळा चौक, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, बोरगाव मंजू, अकोट व वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालात आणखी १५ जणांचे अहवाल सकारात्मक आल्याने आज दिवसभरात ५७ करोनाबाधित आढळून आले आहेत. १५ मध्ये सहा महिला व नऊ पुरुष आहे. हरिहर पेठ येथील सात जण, रजपूतपूरा तीन तर उर्वरित डाबकी रोड, हरिहर मंदिर, खडकी, बाळापूर व वाशीम जिल्ह्यातील मंगळूरपीर येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे.
तपासणीसाठी १० हजारांवर नमुने घेतले
जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १००२१ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ९६७०, फेरतपासणीचे १४३ तर वैद्याकीय कर्मचाºयांचे २०८ नमुने होते. आतापर्यंत एकूण ९९९२ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण नकारात्मक अहवालांची संख्या ८५७१ आहे, तर सकारात्मक अहवाल १४२१ आहेत.