सावंतवाडी तालुक्यात  ६ ते १५ मेपर्यंत संचारबंदी

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजपर्यंत एकूण १० हजार ५२३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ३ हजार ३९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान ८ व्यक्तींचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, तर जिल्ह्यात आज आणखी ५७३ व्यक्तींचा करोना तपासणी अहवाल बाधीत आला असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. सावंतवाडी तालुक्यात करोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेऊन तालुक्यात जनता संचारबंदी पाळण्याचा निर्णय सर्व पक्षीय बैठकीत घेण्यात आला आहे. ही संचारबंदी ६ ते १५ मे पर्यंत असणार आहे.

आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखालील येथील तहसीलदार कार्यालयात ही बैठक पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष संजू परब, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर,उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर,तहसीलदार राजाराम म्हात्रे,सभापती निकिता सावंत,जिल्हाध्यक्ष बाळा गावडे,समीर वंजारी,तालुकाप्रमुख रुपेश राऊळ,गटविकास अधिकारी व्ही.एन.नाईक,तालुका वैद्य्कीय अधिकारी वर्षां शिरोडकर आदि यावेळी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुक्यात मोठय़ा प्रमाणात करोना रूग्ण वाढत आहेत.त्यामुळे ही सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे मात्र तसे होताना दिसून येत नाही त्यामुळेच प्रशासनाकडून कडक भूमिका घेण्यात येईल यासाठी सावंतवाडी तहसिलदार कार्यालयात बैठक झाली.  या बैठकीत ६ ते १५ मे पर्यंत जनता जनता संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला असून यात मेडिकल सुविधा सोडून सर्व बंद राहणार आहे यात व्यापारी, मच्छी व मटण विRेते भाजी व्यवसायिक ही बंद राहणार आहेत.कुणाला ही सकाळच्या सत्रात दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली नाही.असे या बैठकीत ठरविण्यात आले आहे.

या कालावधीत शहरासह तालुक्यात अतिरिक्त पोलीस बल उपलब्ध करून देण्यात येणार असून या जनता कर्फ्यू मध्ये नागरिकांनी सहकार्य करावे कोणीही बाहेर पडू नये असे आवाहन ही करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुका करोनाचा हॉटस्पॉट; ७ गावे प्रतिबंधित

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासातील करोनाबाधितांचा आकडा मंगळवारी पुन्हा सहाशेपर्यंत पोचला असला तरी त्यापैकी सुमारे ५० टक्के एकटय़ा चिपळूण तालुक्यातील आहेत. या तालुक्यातील संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ७ गावे ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

दरम्यान जिल्ह्यातील एकूण १७ जणांचा करोनामुळे मृत्यू ओढवल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले. मात्र त्यापैकी फक्त ७ जण गेल्या २४ तासांमध्ये मृत्यू पावले असून इतर १० जण गेल्या ११ दिवसांमधील एकत्रित नोंद केलेले आहेत. या मृतांमध्ये संगमेश्वर तालुक्यातील ७ , दापोली ५, रत्नगिरी ३, तर राजापूर तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे

जिल्ह्यात गेल्या २४ तासात ५९६ नवीन बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल २४६ बाधित एकटय़ा चिपळूण तालुक्यातील आहेत. त्या तुलनेत रत्नागिरी (८४), खेड (६८), गुहागर (४८), दापोली (४५), संगमेश्वर (३८), लांजा (२६), राजापूर (२५) आणि मंडणगड (१६) या इतर ८ तालुक्यांमध्ये परिस्थितीत सुधारणा होत असल्याची चिन्हे आहेत.

चिपळूण तालुक्यातील आकडा गेल्या ३ दिवसांचा मिळून एकत्रित असल्याचे तालुका पातळीवरील वैद्यकीय अधिकारम्य़ांकडून सांगण्यात आले. तरीसुद्धा मुंबई, पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमधून येथे मोठय़ा प्रमाणावर ये—जा असल्याने करोनाचा प्रादूर्भाव नेहमीच जास्त राहिला आहे.

याचबरोबर, गेल्या २४ तासात जवळपास बाधितांच्या संख्येइतकेच रुग्ण (५२१) बरे होऊन घरी गेले आहेत, ही बाब दिलासादायक आहे.