लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी कोटय़वधी रूपये तसेच मद्याचे साठे जप्त करण्यात येत असताना रविवारी दुपारी तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरील सोनगीर येथील टोलनाक्यावर एका कारमध्ये सुमारे ५८ किलो सोने सापडून आल्याने खळबळ उडाली. हे सोने शिरपूर शिवारातील एका सोन्याच्या कारखान्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे.  टोलनाक्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास तपासणी सुरू असताना पोलिसांना कार संशयास्पद वाटल्याने त्यांनी तपासणी केली असता सोन्याचा साठा आढळून आला. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या घटनेची माहिती महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी प्रकाश महाजन, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग हे सर्व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कार चालकाने हे सोने शिरपूर शिवारातील जी गोल्ड या कारखान्यातून आणल्याची माहिती देत त्यासंदर्भातील कागदपत्रेही संबंधित अधिकाऱ्यांना दाखविले. जिल्हाधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला. हे अधिकारी रात्री जी गोल्ड कारखान्याकडे रवाना झाले होते. कारखान्यात संबंधित कागदपत्रांची तपासणी केल्यानंतरच सोन्याचा साठा कोषागार कार्यालयात ठेवायचा की अन्य कुठे याचा निर्णय होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.