अद्यापि ६५ टक्के पावसाची तूटच

सोलापूर : सलग तिसऱ्या वर्षीही दुष्काळाशी सामना करणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदाचा पावसाळाही कोरडाच जात असताना बुधवारी मात्र शहर व आसपासच्या ग्रामीण भागात दमदार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे सोलापूरकरांना यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच पावसाचा समाधानकारक अनुभव घेता आला. बुधवारी दुपारी सुमारे तासाभरात ५८.१ मिलिमीटर इतका पाऊस झाला. तथापि, जिल्ह्य़ात आतापर्यंत जेमतेम ३५.८२ टक्के एवढाच पाऊस झाला असून अद्यापि ६५ टक्के पावसाची तूट दिसून येते. राज्यात सर्वात कमी पाऊस सोलापुरात झाल्याचे म्हटले जाते.

रब्बी हंगामाचा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्य़ात खरीप हंगामात कमी प्रमाणात पाऊस होतो. नारळी पौर्णिमेनंतर येथे खऱ्या अर्थाने पावसाळा सुरू होतो. परंतु यंदा नारळी पौर्णिमेनंतरही जिल्ह्य़ात पावसाने दडीच मारली आहे. १ जून ते ३० सप्टेंबपर्यंत जिल्ह्य़ात पडणाऱ्या एकूण ५३७७ मिमी पावसापैकी आतापर्यंत (१८ सप्टेंबपर्यंत) ४५७८ मिमी इतका पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात १६४० मिमी इतकाच पाऊस झाला आहे. आतापर्यंत पडणाऱ्या पावसाच्या केवळ ३५.८२ टक्के एवढाच पाऊस झाल्याचे दिसून येते. त्यामुळे अद्यापि ६५ टक्के पावसाची तूट असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सर्वाधिक म्हणजे ५२.६० टक्के पाऊस केवळ माळशिरस तालुक्यातच पडला आहे. तर मंगळवेढय़ासारख्या सदैवी दुष्काळी भागात पावसाने अतिशय निराशा केली आहे. तेथे अवघा २२.७३ टक्के इतकाच पाऊस झाल्याने त्या भागातील दुष्काळाची दाहकता कायम आहे. करमाळा (२६.९१ टक्के), अक्कलकोट (२७.२४ टक्के), माढा (२९.१६ टक्के), मोहोळ (३१.६०व टक्के), पंढरपूर (३३ टक्के) आदी भागात पावसाची स्थिती अतिशय दयनीय आहे. सांगोला (४०.३९ टक्के), उत्तर सोलापूर (४१.८६ टक्के), बार्शी (४३ टक्के), दक्षिण सोलापूर (४७.८४ टक्के) या तालुक्यांमध्ये पावसाचे निराशाजनक चित्र आहे. या पाश्र्वभूमीवर सार्वत्रिक पावसाची अपेक्षा असताना शेवटी बुधवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास आकाशात काळेकुट्ट ढगांची गर्दी होऊन पाठोपाठ दमदार पावसाला प्रारंभ झाला. तासभर संततधार पाऊस सुरूच होता. सायंकाळपर्यंत ५८ मिमी इतका दमदार पाऊस झाल्याची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. या पावसामुळे शहरातील सखल भागात जलमय वातावरण दिसून आले. जिल्ह्य़ात ग्रामीण भागातही काही ठिकाणी पावसामुळे दिलासा मिळाल्याचे सांगण्यात आले.