प्रबोध देशपांडे

अकोला : पश्चिम वऱ्हाडात वेगाने हातपाय पसरवणाऱ्या करोनावर नियंत्रण मिळवण्यात आता यश येते आहे. ५८ टक्के रुग्णांनी करोनाविरोधातले युद्ध जिंकले. अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यांतील एकूण ३८ रुग्णांपैकी आतापर्यंत २२ जणांनी करोनावर मात केली. प्रशासन व आरोग्य विभागाच्या सकारात्मक प्रयत्नातून पश्चिम वऱ्हाडाची करोनामुक्तीच्या दिशेने पुढचे पाऊल पडले आहे.

पश्चिम वऱ्हाडात सुरुवातीच्या काळात करोनाचा संसर्ग रोखण्यामध्ये बऱ्यापैकी यश आले होते. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटी करोनाचा शिरकाव झालाच. पश्चिम वऱ्हाडातील पहिला रुग्ण २९ मार्चला बुलडाणा जिल्ह्यात आढळून आला. त्या रुग्णाचा २८ मार्चलाच मृत्यू झाला होता. त्यानंतर करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली. बुलढाणा जिल्ह्यात २१ करोनाबाधित झाले. त्यातील एकाचा मृत्यू, तर २० जणांवर उपचार करण्यात आले. त्यातील आतापर्यंत १४ जण करोनामुक्त झाले आहेत. करोनाबाधितांवर केलेल्या उपचारानंतर त्यांचे फेरतपासणीचे सर्व अहवाल नकारात्मक आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता जिल्ह्यात सहा करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अकोला जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या १६ वर पोहोचली होती. त्यातील एकाचा १३ एप्रिल रोजी मृत्यू झाला, तर एका करोनाबाधित रुग्णाने ११ एप्रिलला गळा कापून घेत आत्महत्या केली. वाशीम जिल्ह्यातील करोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने अकोला जिल्ह्यातील पातूर येथील सात जणांना करोनाची लागण झाली होती. उपचाराअंती ते करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून टाळ्या वाजवून सुट्टी देण्यात आली. आता अकोला जिल्ह्यात सातच रुग्ण राहिले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वाशिम जिल्ह्यात ३ एप्रिलला करोना दाखल झाला होता. निजामुद्दीन येथील मरकजमध्ये सहभागी मालेगाव तालुक्यातील मेडशी गावात एक रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर प्रशासनाने कडक उपाययोजना केल्याने जिल्ह्यात करोनाचा संसर्ग पसरला नाही. एकाच रुग्णावर वाशिम जिल्हा स्थिरावला.

२१ दिवसांच्या उपचारानंतर त्या रुग्णाने करोनावर मात केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्या रुग्णाला शनिवारी घरी सोडण्यात आले. पश्चिम वऱ्हाडात शेवटचा करोनाबाधित रुग्ण अकोल्यात १९ एप्रिलला आढळून आला. त्यानंतर सुदैवाने गेल्या सहा दिवसांत एकही नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. रुग्णालयात दाखल रुग्ण देखील उपचाराला चांगला प्रतिसाद देत असल्याने पश्चिम वऱ्हाड लवकरच करोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पश्चिम वऱ्हाडात करोनामुळे ५.२६ टक्के मृत्युदर आहे. एकूण तीन मृत्यू झाले असले, तरी त्यातील एकाने आत्महत्या केली. त्यामुळे प्रत्यक्षात करोनामुळे दोघांचेच मृत्यू झाले. अकोला आणि बुलढाणा येथे प्रत्येकी एकाचा करोनामुळे बळी गेला.
पश्चिम वऱ्हाडातील स्थिती (२५ एप्रिल रोजीची)

अकोला जिल्हा

बाधित- १६

करोनामुक्त-०७

मृत्यू -२

बुलडाणा

बाधित-२१

करोनामुक्त-१४

मृत्यू-१

वाशिम

बाधित-१

करोनामुक्त-१

मृत्यू-०

पश्चिम वऱ्हाडात सध्या ३८ रुग्ण करोनाग्रस्त आहेत. २२ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर आत्तापर्यंत तिघांचा करोनाची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे.