राज्यात करोनाचा संसर्ग दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने करोनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने १५ दिवसांसाठी संचारबंदीची देखील घोषणा केलेली आहे. मात्र तरी देखील रूग्ण संख्या कमी होत नसल्याने, आता राज्यात कडक लॉकडाउन लावला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ५८ हजार ९२४ नवीन करोनाबाधित आढळले असून, ३५१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर सध्या १.५६ टक्के एवढा आहे.

दरम्यान आज ५२ हजार ४१२ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३१,५९,२४० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८१.०४ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४०,७५,८११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३८,९८,२६२ (१६.१९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३७,४३,९६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,०८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,७६,५२० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात कडक लॉकडाउन? दोन दिवसांत उद्धव ठाकरे निर्णय घेणार

राज्यात ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली दिसत नाही. दैनंदिन रुग्णसंख्या वाढत असून राज्य सरकारची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन लागण्याचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री दोन दिवसांत यासंबंधी निर्णय घेतील अशी माहिती त्यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दिल्लीत नुकताच सहा दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला असून कशा पद्धतीने अमलबजावणी होणार आहे याची माहिती घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

राज्यात आता किराणा दुकानं चार तासचं सुरू राहणार!

राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्या शासनाने निर्बंध कडक करत १५ दिवसांसाठी संचारबंधीची घोषणा केली आहे. मात्र निर्बंध लागू असतानाही किराणा खरेदीच्या नावावर नागरिक दिवसभर घराबाहेर फिरत असल्याने, आता किराणा दुकानांची वेळ सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत मर्यादित ठेवण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज (सोमवार) घेण्यात आला आहे.