मराठवाडय़ातील औरंगाबाद व जालना मतदारसंघांत अनुक्रमे ५९ व ६० टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे. मतदानादरम्यान कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. हे दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे शिवसेना, भाजपच्या ताब्यात होते. त्यामुळे येथील खासदारांना ‘मुदतवाढ’ मिळते की नाही, या विषयी कमालीची उत्सुकता होती. दिवसभर मतदारांमध्ये उत्साह होता. मतदान यंत्रे बिघडल्याच्या औरंगाबादमध्ये तीन, तर जालना येथे दोन तक्रारी प्रशासनाकडे आल्या. दोन्ही मतदारसंघांत गेल्या वेळपेक्षा मतदानाचा टक्का वाढला.
रायगडात सरासरी ६४ टक्के
रायगड मतदारसंघात सरासरी ६४ टक्के मतदान झाले. खासदार अनंत गीते आणि सुनिल तटकरे यांच्यासह १० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. मुरुड आणि पेण येथील निवडक प्रकार वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिरा शांततेत व सुरळीत पार पडली. पेणमध्ये ५५ टक्के, अलिबागमध्ये ५७ टक्के, श्रीवर्धन आणिमहाडला ५५ तर दापोली व गुहागरमध्ये ५३ टक्के  मतदान झाले.