26 February 2021

News Flash

जिल्ह्य़ातील शेतकरी आत्महत्येचा आलेख वाढताच

नगर जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आलेख वाढू लागला आहे.

प्रातिनिधिक छायाचित्र

पाच महिन्यांत ५९  तर साडेतीन वर्षांत ३७० आत्महत्या

नगर जिल्ह्य़ातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आलेख वाढू लागला आहे. यंदाच्या वर्षांतील गेल्या पाच महिन्यांत ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांच्या सध्याच्या संपाच्या पाश्र्वभूमीवर ही आकडेवारी ठळकपणे जाणवणारी आहे. गेल्या साडेतीन वर्षांत जिल्ह्य़ातील ३७० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. यातील १९९ जणांचे कुटुंब मदतीसाठी पात्र ठरली आहेत. यामध्ये महिलांचाही समावेश आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना मदतीसाठीच्या समितीची बैठक आज, शनिवारी जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ३५ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. यातील १८ प्रस्ताव अनुदानासाठी पात्र ठरले. त्यात दोन कर्जबाजारी शेतकरी महिलांचाही समावेश आहे. १० प्रस्ताव अपूर्ततेमुळे फेरचौकशी करण्याचे आदेश देण्यात आले तर ७ प्रस्ताव अपात्र ठरवण्यात आले. जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती अजय फटांगरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस उपअधीक्षक अरुण जगताप, कृषी अधिकारी राऊत आदी उपस्थित होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी अनुदानातून मदत देण्यासाठी जिल्हा परिषदेने खास तरतूद केल्याची माहिती बिनवडे यांनी यावेळी दिली.

यंदाच्या जानेवारीत ९, फेब्रुवारीत ५, मार्चमध्ये १४, एप्रिल व मेमध्ये प्रत्येकी १५ अशा एकूण ५९ शेतकऱ्यांनी गेल्या पाच महिन्यात आत्महत्या केल्या. सन २०१६ मध्ये १४४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यातील ९२ शेतकऱ्यांचे वारस अनुदानासाठी पात्र ठरले, सन २०१५ मध्ये ११८ पैकी ६८ पात्र ठरले, सन २०१४ मध्ये ४९ पैकी २१ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंब अनुदानासाठी पात्र ठरले.

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तालुका पातळीवर तहसीलदार, पोलीस निरीक्षक, कृषी अधिकारी यांची समिती आहे. ही समिती संबंधित व्यक्ती शेतकरी आहे का, त्यांनी कर्ज घेतले होते का, शेत नापिकी होते का, कर्जाच्या वसुलीसाठी नोटिसा, तगादा सुरू होता का, शवविच्छेदन अहवाल, पोलिसांचा अहवाल याद्वारे खात्री केली जाते, नंतर हा प्रस्ताव तपासणीसाठी प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवला जातो, प्रांत जिल्हा समितीकडे शिफारस करतात. जिल्हा समिती पुन्हा आढावा घेऊन मंजुरी देते. निकषानुसार एकूण १ लाख रुपयांची मदत दिली जाते, त्यातील ३० हजार रोख स्वरुपात तर ७० हजार रुपये बचत ठेवीच्या स्वरुपात दिले जातात.

यंदाच्या वर्षांत राधाबाई अशोक उगले (नायगाव, जामखेड) व लीला गोरक्ष ढेरंगे (पिंपळगाव देपा, संगमनेर) या दोन शेतकरी महिलांनी कर्जबाजारीपणामुळे आपले जीवन संपवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2017 4:21 am

Web Title: 59 farmers commit suicide in last five months in ahmednagar
Next Stories
1 संप मागे घेतल्याच्या जिल्ह्य़ात तीव्र प्रतिक्रिया, आंदोलने सुरूच
2 गोपीनाथ मुंडे कल्पनेपलीकडचे लोकनेते – रेल्वेमंत्री सुरेश प्रभू
3 शेतकरी संपात फूट
Just Now!
X