५९ जणांमध्ये २१ आरोपींचा समावेश

रमेश पाटील, वाडा

वाडा : डहाणू तालुक्यातील गडचिंचले साधू हत्याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवलेल्या २२ आरोपींपैकी एका आरोपीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या आरोपीच्या संपर्कात आलेल्या ५९ जणांचे अलगीकरण करण्यात आले आहे. यामध्ये २१ आरोपींचा समावेश आहे.

डहाणू, गडचिंचले साधू हत्या प्रकरणात १०० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींची संख्या जास्त असल्याने ते एकाच ठिकाणी ठेवणे शक्य नसल्याने त्यांना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. यापैकी २२ आरोपींना वाडा पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. पोलीस कोठडीत ठेवण्याअगोदर या आरोपींचे घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकीच एका आरोपीचा शनिवारी (२ मे) करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

आरोपीच्या संपर्कातील ५९ जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून सदरचे अहवाल  येत्या २४ तासांत  येणे अपेक्षित असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली आहे.दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून वाडा पोलीस ठाणे तसेच शेजारील तहसीलदार कार्यालयाचा परिसर सील करण्यात आला आहे. वाडा शहरातील औषधाची दुकाने व दवाखाने वगळता सर्व बाजारपेठ ७ मेपर्यंत पूर्णपणे बंद असतील.