राज्यातल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा करोनाचा प्रादुर्भाव लक्ष घेता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याविषयी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने एक परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा(५वी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा(८वी) या परीक्षा राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये २३ मे रोजी होणार होत्या.

मात्र, राज्यातला करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परिक्षेची तारीख आता नंतर कळवण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुनही याबद्दल माहिती दिली आहे. याचबरोबर देशातल्याही अन्य महत्त्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणारी जेईई मेन्सची चौथ्या टप्प्यातली परीक्षाही आता स्थगित करण्यात आली आहे.