तटरक्षक दलाने वसईजवळील समुद्रात पाणजू बेटानजीक संशयास्पदरीत्या जाणाऱ्या 6 बोटींचा पाठलाग करून त्यातील दोन बोटींना ताब्यात घेतलं व 14 संशयित बांगलादेशींना पकडलं. मात्र, इतर चार बोटी आणि त्यावरील माणंस पळून जाण्यात यशस्वी झाले.

तटरक्षक दलाकडून अरबी समुद्रातील हालचालीकडे लक्ष ठेवण्यासाठी ‘सजग’ मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत गस्त घालत असताना शनिवारी वसईच्या पाणजू बेटाजवळ समुद्रात 6 बोटी संशयास्पद हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. सकाळी 11.30 वाजता पाणजू बेटानजीक 19.60 डिग्री उत्तरेकडे 6 बोटी रेती भरून वेगाने जात असल्याचे समजले. तटरक्षक दलाने त्यांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली आणि 2 बोटी ताब्यात घेतल्या. मात्र अन्य 4 बोटी तिवरालगत लावून त्यातील सर्व लोक त्या तिवरांच्या जंगलात पसार झाले.
ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे कुठलीही ओळखपत्रे, बोटीची नोंदणी आदी कागदपत्रे मिळाली नाहीत. तसेच त्यांच्या भाषेवरून ते बांगलादेशीय वाटत असल्याने कोस्टगार्डने त्यांना पकडून वसई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

आबिल शेख (25), शफीकुल (27),आहाजित (33), मोईद्दीन (45), इस्लाम (35), बी.शेख (22), शैफुल (27), एन मुल्ला (45), रफीगुल (19), शहीफुल (27), जे मुल्ला (40), मोंडल (28), पायनल (38), इब्राहिम शेख (25) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावं आहेत. तटरक्षक दलाचे कमांडर विजय कुमार व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.