उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे नगरपालिकेच्या भरारी पथकाने सुमारे सहा कोटींची रक्कम घेऊन जात असलेल्या एका व्यक्तीसह व्हॅन ताब्यात घेतली. या व्हॅनमध्ये ५०० च्या जुन्या नोटा आढळून आल्या. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीने तुळजापूर शहरात भरारी पथकाची नेमूणक करण्यात आली आहे. या पथकाने संशयावरून ही व्हॅन उभी करून त्यांची तपासणी केली असता सुमारे ६ कोटींची रक्कम आढळून आली. व्हॅन चालकाकडे याची चौकशी केली असता. त्याने सांगलीतील एका सहकारी बँकेची ही रक्कम असल्याचे म्हटले. परंतु त्या व्यक्तीसोबत बँकेची आवश्यक ती कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली असून व्हॅन व चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या चार दिवसातील अशा प्रकारची ही चौथी घटना घडली आहे. दुसरीकडे नागपूरमध्येही १ कोटी ८७ लाख ५० हजारांची रोकड आढळून आली. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर सांगली जिल्ह्यातील विटा येथेही सुमारे २२ लाख ८५ हजारांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जागोजागी तपासणी नाके सुरू केले आहेत. या दरम्यान तपासणी करताना ५०० रूपयांच्या जुन्या नोटा असलेली सुमारे सहा कोटींची रक्कम मिळाली. व्हॅन चालकाची चौकशी केली असता त्याने ही रक्कम एका सहकारी बँकेची असल्याचे सांगितले. परंतु त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रे मिळाली नाहीत. त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.

नागपूर शहरात हिलटॉप परिसरातील एका फ्लॅटमधून तब्बल १ कोटी ८७ लाख ५० हजारांची रोकड पोलिसांनी जप्त केली. यात चलनातून बंद केलेल्या ५०० आणि १००० च्या नोटांचा समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले आहे. आयकर विभागाला याची माहिती दिली असून तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. ताब्यात घेतलेल्या ४ व्यक्तींपैकी एक जण चार्टर्ड अकाऊंटंट असल्याचे सांगत आहे.

विट्यातही रविवारी रात्री २२ लाख ८५ हजार रूपयांची रक्कम घेऊन जाताना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर रोजी ५०० व हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. परंतु देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ही घोषणा झाल्यापासून काळा पैसा बाळगणारयांचे धाबे दणाणले आहे. देशात विविध ठिकाणी कचऱ्याच्या पेटीत, दुचाकी, कारमध्ये जुन्या नोटा आढळून आल्या आहेत. तर काही ठिकाणी या नोटा जाळण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून येते.