गणेश विसर्जन करताना उत्तर महाराष्ट्रात पाण्यात बुडून सहा जणांचा मृत्यू झाला. त्यात नाशिक जिल्ह्यातील पाच, तर जळगावमधील एका जणाचा समावेश आहे.
चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील बंधाऱ्यात गणेश मूर्ती विसर्जनासाठी गेलेले दोस्ती मित्र मंडळाचे कार्यकर्ते वैभव पंडित शिंदे (२०) आणि सागर जनार्दन बच्छाव (२०) हे बुडाले. ग्रामस्थांनी धाव घेऊन संबंधितांना बाहेर काढले; परंतु तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले होते. लासलगावजवळील निमगाव वाकडा येथे पालखेड डावा कालव्यात विजय सखाराम अहिरे (३५, रा. निमगाव वाकडा) हे विसर्जन करताना बुडाले. अहिरे हे मूळचे कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथील असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. मालेगाव तालुक्यात मोसम नदीतील बंधाऱ्यात बुडून प्रसाद विलास जाधव (२१) या तरुणाचा मृत्यू झाला. वालदेवी नदीत विसर्जन करताना रुपेश गांगुर्डे हा तरुण बुडाला. त्याचा मृतदेह अद्याप सापडू शकला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जळगाव शहरातील मेहरूण तलावात विसर्जन करताना मोहन सुनील मराठे (१७) या युवकाचा बुडून मृत्यू झाला. मोहन आपल्या तीन मित्रांसह पाण्यात उतरला होता. हे सर्व जण गाळात रुतले. त्यातील एक जण कसाबसा बाहेर आला. त्याने आरडाओरड केल्यावर नागरिकांनी धाव घेऊन इतरांना बाहेर काढले; परंतु सुनीलला वाचविण्यात यश आले नाही. अन्य तिघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.