कोयना धरणाजवळ शनिवारी सायंकाळी ५ वाजता भूकंपाचा धक्का बसला. त्याची तीव्रता ३.५ रिश्टर असून, केंद्रबिंदू धरणापासून दक्षिणेला ११.२ किमी, तर गोषटवाडी गावाच्या आग्नेयेस ६ किमी अंतरावर आहे. या भूकंपाच्या केंद्रबिंदूची खोली भूगर्भात ९ किलोमीटरवर आहे. या विभागात गेल्या चार दिवसांत भूकंपाचे मध्यम स्वरूपाचे ६ धक्के बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भूकंपाच्या धक्क्यांचा केंद्राबिंदू कोयना धरणापासून दक्षिणेस गोषटवाडीजवळ आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कोयना धरण परिसरात बुधवारी सायंकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी ४.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला. त्याच दिवशी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ३.२ आणि मध्यरात्रीनंतर १२ वाजून ४७ मिनिटांनी ३.६ रिश्टरचा धक्का जाणवला. तसेच गुरुवारी सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी २.९ रिश्टरचा भूकंपाचा धक्का बसला होता. उष्म्याचा उच्चांक आणि कोयना धरणातील पाणीसाठय़ाने तळाकडे वाटचाल केली असताना, भूकंपाच्या धक्क्यांची मालिका सुरू आहे. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी या भूकंपाच्या मालिकेची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविली आहे.