उत्तराखंडमधील जंगलातील आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असतानाच ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहुर्ली कक्ष क्रमांक ८३८ मधील जंगलाला सोमवारी दुपारी अचानक आग लागून ६ हेक्टर जंगल जळून राख झाले. १३ वन कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी हानी टळली.

जिल्ह्य़ात तापमान ४५ अंशाच्या वर असताना जंगलात छोटे-मोठे वणवे लागण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारी ताडोबाच्या बफर क्षेत्रातील मोहुर्ली वनपरिक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ८३८ मधील जंगलाला अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटांत या आगीने उग्र रूप धारण केले. त्यामुळे धोका निर्माण झाला होता. मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिंदे यांनी वनकर्मचाऱ्यांसह आग आटोक्यात आणली. मात्र, त्यात मोहुर्लीतील ६ हेक्टर जंगल जळून राख झाले होते. यात वन्य प्राण्यांना झळ किंवा जंगलाचे मोठे नुकसान झाले नाही. तेंदूपत्ता किंवा मोहफूल वेचण्यासाठी आग लावण्यात आली असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

आग विझविण्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री

वनाला लागणारी आग तातडीने विझविण्यासाठी आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्याचा विचार आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली. या संदर्भात पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्यास वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. जंगलाला आग लागली तर ती सहसा लवकर आटोक्यात येत नाही. असा वणवा  विझविण्याची आधुनिक यंत्रसामुद्री खरेदी करण्याचा विचार आहे.

आगीत मोहुर्ली परिक्षेत्रातील केवळ १ हेक्टर जंगल जळाले असून उर्वरित ५ हेक्टर जळालेले जंगल हे चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अखत्यारीत येते. आग नेमकी कशी लागली, याबाबत माहिती नाही. मात्र यात वन्यप्राण्यांना झळ पोहोचली नाही.

– गजेंद्र नरवने , पवनसंरक्षक