गणेश उत्सवात प्रतिष्ठापनेच्या मिरवणुकीदरम्यान सोमवारी रात्री झालेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या धुमश्चक्रीसंदर्भात तोफखाना पोलिसांनी स्वत:हूनच दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेत चौघा पोलिसांसह सहाजण जखमी झाले. आज सायंकाळपर्यंत कोणाला अटक करण्यात आली नव्हती.
तोफखाना भागातीलच तोफखाना मित्रमंडळाची मिरवणूक आठच्या सुमारास ही धुमश्चक्री घडली, त्यात दगडफेक व सोडावॉटरच्या बाटल्या फेकण्यात आल्या. पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तणाव निवळला असला तरी चितळे रस्त्यावरील जिल्हा वाचनालयाच्या परिसरात अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पोलीस शिपाई दळवी (भिंगार कँप ठाणे), गुंजाळ (स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा), अभय कदम व सुरेश डोके (दोघेही तोफखाना ठाणे) यांच्यासह तोफखाना मंडळाचे सूरज सुभाष जाधव व त्याचा भाऊ सुशांत असे सहा जण जखमी आहेत. पोलीस उपनिरीक्षक चितमपल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मंडळाचे सूरज, सुशांत, जगदीश जाधव, संदीप जाधव, दिलबीरसिंग आदींसह २० ते ३० जणांविरुद्ध तर शिवसेनेचे सचिन जाधव, मनोज चव्हाण, सागर काळे, संदीप अर्जुन दातरंगे, बंटी परदेशी व इतर २० ते ३० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. तोफखाना मंडळ वाचनालयासमोर आले असताना लाईटची माळ लावलेला बांबू का हलवला याच्या वादातून ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
धुमश्चक्रीनंतर फिर्याद देण्यासाठी राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप व शिवसेनेचे आमदार अनिल राठोड आपापल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात गेले होते, मात्र पोलिसांनी स्वत:च फिर्यादी होत गुन्हा दाखल केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 11, 2013 12:14 pm