पोलिओ डोस दिल्याने मृत्यू; पालकांचा आरोप
पालघर : मोखाडय़ातील खोच येथील सहा महिन्यांच्या बालकास मंगळवारी ७ जूनला पोलिओ रोटा ही लस दिल्यानंतर त्याच दिवशी रात्री अकराच्या दरम्यान या बाळास त्रास जाणवू लागला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
बाळाचा मृत्यू पोलिओ डोस दिल्यानेच झाल्याचा आरोप त्याच्या पालकांनी केला असल्याची माहिती येथील सरपंच पांडू मालक यांनी दिली. मोखाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोखाडय़ातील खोच भागात मंगळवारी आरोग्य विभागाकडून पोलिओ रोटा लस लहान बालकांना देण्यात आली होती. खोच येथील राजू मोहोंडकर यांच्या बालकासही ही लस देण्यात आली होती. दरम्यान, रात्री अकराच्या दरम्यान या बाळास त्रास जाणवू लागला आणि मृत्यू झाला. सकाळी पोलिओ रोटाचा डोस दिल्यानेच बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
खोच येथे मंगळवारी १२ बालकांना पोलिओ रोटा लशीचे डोस देण्यात आले आहेत. मात्र, कोणत्याही बालकास त्रास झाल्याचे आढळले नाही. या सहा महिन्यांच्या बालकाचा मृत्यू कशाने झाला हे अजून स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा अहवाल प्राप्त होताच खरे कारण कळेल.
-डॉ. किशोर देसले, तालुका वैद्यकीय अधिकारी, मोखाडा
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 9, 2020 1:54 am