तीन महिन्यात ६ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षलवाद्यांचा गड, अशी ओळख असलेल्या एटापल्ली तालुक्यातील अतिसंवेदनशील कोटमी येथील नक्षलवाद्यांचा गड पूर्णत: ढासळला आहे. गडचिरोली जिल्हा पोलिस दलाने कोटमी येथे एका तंबूत उपपोलिस ठाणे सुरू करून स्थानिकांचा विश्वास संपादन केल्यामुळेच हे यश संपादन करता आले आहे.

दक्षिण गडचिरोलीत अहेरी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व धानोरा या पाच तालुक्यांमध्ये नक्षलवादी अधिक सक्रीय आहे. घनदाट जंगल व अतिदुर्गम भाग असल्यामुळेच दक्षिण गडचिरोलीत नक्षलवादी चळवळ फोफावली. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दक्षिण गडचिरोलीतील या पाचही तालुक्यांकडे अधिक लक्ष्य केंद्रित केले आहे. परिणामत: नक्षलवाद्यांचा गड, अशी ओळख असलेल्या कोटमी येथील ६ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने हा गड पूर्णत: ढासळला आहे. सर्वप्रथम चातगाव दलम कमांडर विजय उर्फ धनिराम केशरी दुग्गा व त्याची पत्नी राधा उर्फ वासंती मनिराम कोवा यांनी आत्मसमर्पण केले. त्या पाठोपाठ कसनसूर दलम सदस्य विशाल उर्फ मुंशी येशू पोटवी (३०,रा.आसावंडी), पोमके (कोटमी, ता. एटापल्ली) तसेच २००४-०९ पर्यंत नईबेरड दलमचा सदस्य प्रभाकर उर्फ लालू उर्फ रामदास गोटा (३०), २०१२-१४ पर्यंत चातगाव दलमचा सदस्य किशोर उर्फ पुनाजी छत्रू कुमेटी (२०,रा. पुसेरा, ता. चामोर्शी) आणि कसनसूर दलममध्ये डॉक्टर असलेला सुधाकर दानू आतला (२८,रा.पडयानटोला, ता. एटापल्ली) अशा ४ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

विशेष म्हणजे, हे सहाही नक्षलवादी व्यवस्थेचे बळी होते. मात्र, नक्षल चळवळीतही हीच व्यवस्था असून लोकशाहीत मत तरी व्यक्त करता येते, परंतु चळवळीत नेत्यांच्या विरोधात गेले की, मृत्यूदंडच आहे. तसेच जंगलात भीतभीतच आयुष्य कंठावे लागते. चळवळीत बराच अत्याचार होतो, हे प्रत्यक्ष अनुभवल्यानंतरच या ६ जणांनी आत्मसमर्पण केले. एटापल्ली तालुक्यातील कोटमी हे शंभर टक्के नक्षलवादी गाव. तालुक्याच्या ठिकाणाहून ३० कि.मी.वर असलेले कोटमी पहिले कसनसूर पोलिस ठाण्यांतर्गत येत होते. तीन महिन्यांपूर्वी कोटमीत अक्षरश: जंगलात एक तंबू उभारून उपपोलिस ठाणे उभारले गेले. यानंतर येथील पोलिसांनी वैविध्यपूर्ण समाजोपयोगी उपक्रम राबवून परिसरातील नागरिकांची मने जिंकली आणि अति नक्षलग्रस्त जनतेच्या मनात पोलिसांप्रती विश्वास निर्माण केला. त्याचीच प्रचिती नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात झाली. विशेष म्हणजे, गडचिरोली पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानासोबतच समाजजागृती, नक्षल आत्मसमर्पण योजनेची माहिती गावकरी व नक्षल्यांपर्यंतही यशस्वीपणे पोहोचविली आणि अवघ्या ४ महिन्यात ६ जहाल नक्षलवाद्यांनी कोटमी पोलिस मदत केंद्रात आत्मसमर्पण केले. त्यामुळे नक्षली नेते हादरले आहेत.

जंगलात चौकी उभारून नक्षलवाद्यांशी लढा देणे ही सोपी गोष्ट नाही. मात्र, गडचिरोली पोलिसांनी नुसता लढाच दिला नाही, तर नक्षलवाद्यांचीही मने जिंकून त्यांना आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. त्यामुळे नक्षलवादी नेते चांगलेच हादरले आहेत. आज कोटमी या एकाच गावातील ६ नक्षलवादी चळवळ सोडूल गेले. उद्या चळवळीतील इतर सदस्य बाहेर पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गडचिरोली पोलिसांच्या या प्रशंसनीय कामगिरीमुळे लवकरच या भागातून ही चळवळच हद्दपार झालेली दिसेल, याचा आनंद स्थानिक आदिवासींच्या चेहऱ्यावर बघायला मिळत आहे.