सांगली : सांगली-कडेगाव येथील वांगी येथे ट्रॅक्टर आणि क्रुझर जीप या वाहनांमध्ये भीषण अपघात झाला असून त्यात ५ पैलवानांसह चालकाचा मृत्यू झाला आहे. तर इतर ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. शिरगांव फाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सुत्रांकडून कळते. साताऱ्यातील औंध येथे कुस्ती स्पर्धेत खेळून परतताना हा अपघात घडला.

पोलिसांच्या माहितीनुसार, विजय शिंदे, आकाश देसाई, शुभम घारगे, सौरभ माने, अविनाश गायकवाड, रणजीत धनवडे अशी मृतांची नावे आहेत. तर, अजय कासुर्डे, अनिकेत जाधव, अनिकेत गावडे, रितेश चोपडे, अनिल पाटील, प्रतिक निकम आणि तुषार निकम हे जखमी झाले आहेत.

सध्या सांगली-कडेगाव भागातील साखर कारखान्यांना ऊसाचे गाळप सुरु असून त्यासाठी परिसरातील मुख्य रस्त्यांवर रात्रीच्या वेळी ऊसाची वाहतुक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉलीज मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. यातील एका ट्रॅक्टरला पैलवानांना घेऊन जाणाऱ्या क्रुझर जीपने समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात ५ पैलवानांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. इतर ५ जणही गंभीर जखमी झाले आहेत. जीपमधून एकूण अकरा जण प्रवास करीत होते. जखमींना सांगलीतील रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. हे सर्व पैलवान कुंडलच्या क्रांती कुस्ती संकुलाचे सदस्य होते. एबीपी माझाने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

या भीषण अपघातात क्रुझर जीपचा चक्काचूर झाला असून ट्रॅक्टरचा मागचा टायरही फुटला. पैलवानांना घेऊन जाणारी जीप भरधाव वेगाने समोरच्या ट्रॅक्टरवर जाऊन आदळल्याने या अपघाताची तीव्रता मोठी होती. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच कुस्ती क्षेत्रातून ही अतिशय दुर्देवी असल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.

या दुखःद घटनेमुळे शनिवारी विश्वजीत कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यामध्ये होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. या दुर्दैवी घटनेत मृत्यू पावलेल्या तरुणांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशी प्रतिक्रिया कदम यांनी दिली आहे.