मुंबईतील विषारी दारूकांडानंतर सर्वच जिल्ह्यांत अनधिकृत दारू विक्रेत्यांविरुद्ध मोहीम हाती घेण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात ६० जणांच्या मुसक्या आवळताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ३ लाख रुपयांचा अवैध साठा जप्त केला.
आंध्र-कर्नाटक सीमेवरील नांदेड जिल्ह्यात सिंधी (ताडी), तसेच रसायनमिश्रीत दारूची वाहतूक, निर्मिती व विक्री विनासायास सुरू आहे. मनुष्यबळाची वानवा, कायद्यातील पळवाटा यामुळे उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी कारवाया केल्यानंतरही हा प्रकार बिनदिक्कत सुरू असतो. मात्र, मुंबईतील घटनेनंतर राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी गणेश पाटील यांनी विशेष पथके स्थापन केली. पथकांनी मुखेड तालुक्यातील कोटग्याळ तांडा, बंडगिर तांडा, उंद्री तांडा, जाहूर तांडा, चव्हाणवाडी तांडा, होनवडज तांडा, किनवट तालुक्यातील बोधडी व बिलोली तसेच नांदेड तालुक्यात विविध ठिकाणी छापे टाकून ६० जणांना अटक केली. त्यांच्याकडून ३ लाखांची हातभट्टीची दारू, रसायन, देशी दारू, ताडी असा ऐवज जप्त करण्यात आला. मुदखेड तालुक्यातील वाडी-तांडय़ावर, तसेच माहूर, हिमायतनगर, किनवट या सीमावर्ती भागात अजूनही कमी-अधिक प्रमाणात रसायनमिश्रीत दारूची विक्री केली जात असल्याचे सांगण्यात आले.