रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासांत  ६० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २६ गुहागर तालुक्यातील आहेत.

या एका दिवसातील या उच्चांकी वाढीमुळे जिल्ह्यातील गेल्या एप्रिल महिन्यापासूनच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १ हजार १३० झाली आहे.

दरम्यान गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यातील ३ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या महामारीमुळे बळींची संख्या ४० झाली आहे.

जिल्ह्यातील करोनाबाधित रूग्णांची तालुका वार आकडेवारी पुढीलप्रमाणे — गुहागर २६, कामथे  उपजिल्हा रुग्णालय १८,  जिल्हा कोव्हीड रुग्णालय, रत्नागिरी – ११ रुग्ण,  दापोली – ३, घरडा केंद्र (खेड) १ .

या व्यतिरिक्त शुक्रवारी जिल्ह्यात प्रथमच  अ‍ॅन्टीजेन चाचणी सुरू करण्यात आली. त्यामध्ये १ रुग्ण करोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याचबरोबर, प्रकृती सुधारल्याने शुक्रवारी १७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या ६८२ झाली आहे.

करोनामुळे ६७ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसरा मृत्यू झालेला रुग्ण संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील असून त्याचे वय ५८ वर्षे होते. त्याला मधुमेहचा आजार होता. तसेच चिपळूण येथील एका ५७ वर्षीय रुग्णाचाही उपचार दरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनाबाधित मृत्यूंची संख्या ४० झाली आहे.

जिल्ह्यात सध्या ८० ‘प्रतिबंधित क्षेत्रे’आहेत. संस्थात्मक विलगीकरणात कक्षामध्ये एकूण १०४ संशयित करोना रुग्ण दाखल आहेत, तर गृह अलगीकरणाखाली असलेल्यांची संख्या ११ हजार ८९४ आहे.