गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी १४२ विशेष गाड्या हाऊसफुल्ल झाल्यानंतर मध्य रेल्वेने आता आणखी ६० विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई- चिपळूण, लोकमान्य टिळक टर्मिनस- करमळी, पनवेल- सावंतवाडी, पुणे- सावंतवाडी या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत.

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या सर्वाधिक असते. रेल्वे, एसटी, खासगी गाड्या अशा मिळेल त्या मार्गाने चाकरमानी कोकणात जातात. चाकरमान्यांच्या सोयीसाठी रेल्वेने सुरुवातीला १४२ विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. या गाड्या फुल्ल झाल्यानंतर आता रेल्वेने आणखी ६० जादा विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यंदा सर्वाधिक विशेष गाड्या सोडण्यात आल्याचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी म्हटले आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस- करमळी वातानुकूलित विशेष (६ फेऱ्या), लोकमान्य टिळक टर्मिनस- करमळी साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या), पनवेल- सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (दर शनिवारी- ८ फेऱ्या), पनवेल- सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (दर रविवारी- ८ फेऱ्या), पुणे सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष (८ फेऱ्या) या स्थानकांदरम्यान विशेष गाड्या धावतील.  मुंबई – चिपळूण दरम्यान आठवड्यातून तीन वेळा विशेष गाडी धावणार आहे. दर मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधून ही गाडी सुटेल. चिपळूणवरुनही याच दिवशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.

गणेशोत्सवादरम्यान मध्य रेल्वेने सोडलेल्या विशेष गाड्यांचा आकडा आता २०२ वर पोहोचला आहे. या सर्व गाड्यांमधील आरक्षणाला १८ जुलैपासून सुरुवात होईल. रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या कृपादृष्टीमुळे यंदा तरी चाकरमान्यांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.