महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेत ६० विषारी साप सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. साप असल्याचे समजताच विद्यार्थी आणि शाळेच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच पळापळ झाली. पंगरा बोखरे गावातील ही शाळा जिल्हा परिषदेतर्फे चालवली जाते. शुक्रवारी दुपारी एक महिला मुलांचे भोजन बनवण्यासाठी लाकडे ठेवलेल्या भागात गेली. त्यावेळी तिला तिथे दोन साप दिसले.

तिने काही लाकडे उचलल्यानंतर तिला तिथे आणखी ५८ साप दिसले. तिने लगेच्या शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कानावर हा प्रकार घातला. एकाचवेळी इतके सर्व साप बघून आमची सुद्धा भितीने गाळण उडाली असे शाळेचे मुख्याध्यापक त्र्यंबक भोसले यांनी सांगितले. जेव्हा गावातल्या लोकांना याबद्दल समजले तेव्हा ते काठी आणि दगड घेऊन पोहोचले पण मी त्यांना सापांना मारण्यापासून रोखले.

त्यानंतर आम्ही विक्की दलाल नावाच्या एक सर्पमित्राला बोलावले. त्याने दोन तास मेहनत करुन सर्व सापांना सुरक्षितरित्या पकडून एका मोठया बाटलीत टाकले. हे सर्व साप नंतर वन विभागाचे अधिकारी जेडी काचवे यांच्या ताब्यात दिले असे शाळेचे व्यवस्थापक भीमराव भोखरे यांनी सांगितले.