कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाला २५०० रुपये दर देऊ केला असताना साखर कारखानदारीचे आगर असणा-या सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी मात्र तब्बल सहाशे रुपयांनी कमी म्हणजे १९०० रुपये दर देऊ केला आहे. जिल्ह्यातील सहा साखर कारखान्यांनी हा दर जाहीर केला असला तरी अद्याप दहा कारखान्यांनी गाळप सुरू करून दीड महिना झाला तरी दरच जाहीर केला नाही.
उसाला एफआरपीनुसार दर मिळाला पाहिजे यासाठी आक्रमक असणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना अद्याप उदासीन भासत आहे. गेल्या आठवडय़ात मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र या आंदोलनाला साखर कारखानदारांनी भिक घातली नाही. क्रांती कारखान्याने १९०० दर जाहीर करून कोंडी फोडताच सोनहिरानेही हाच दर जाहीर केला. पाठोपाठ हुतात्मासह राजारामबापू सर्वोदय, वाटेगाव या एकाच छत्राखाली सुरू असणा-या साखर कारखान्यांनी गाळप उसाचे बिल १९०० रुपये दराने कोणताही गाजावाजा न करता उत्पादकांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहेत.
जिल्ह्यात सुरू असणा-या डफळे, विश्वास, महांकाली, माणगंगा, वसंतदादा, आरग, यशवंत, केन अॅग्रो, उदगिरी आणि सद्गुरू या कारखान्यांनी अद्याप दर जाहीर केलेला नाही. सांगलीच्या वसंतदादा साखर कारखान्याने गेल्या वर्षी गाळप केलेल्या उसाचे बिल दिले नसल्याने गाळप परवाना रोखला असतानाही गाळप सुरू केले आहे. साखर संचालकांनी या कारखान्याला दंडात्मक कारवाईची नोटीस दिली असली तरी गाळप सुरूच आहे. कारखान्याच्या मालकीच्या धडक योजनेचे पाणी वापरणा-या शेतक-यांचा ऊस गाळपासाठी आणला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सांगली जिल्ह्यातील उसाचा उतारा चांगला असल्याने एफआरपीनुसार जादा दर मिळणे अपेक्षित असताना साखर कारखान्याकडून कोल्हापूरपेक्षा सहाशे रुपये टनाला कमी करून दर देण्याचा अघोषित निर्णय कारखान्यांनी घेतला आहे. अगोदरच कारखाना हंगाम विलंबाने सुरू झाल्याने तोड मिळविणे शेतक-याला जिकिरीचे झाले असून आणखी विलंब झाला तर उसाला तुरे येण्याचा धोका आहे. यामुळे वजनात घट होणार असल्याने उस उत्पादक दुहेरी संकटात सापडला आहे.
उस दराची कोंडी फोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मंगळवार, दि. ३० डिसेंबर रोजी ऊस उत्पादक आणि कारखाना प्रतिनिधींची बठक बोलावली आहे. या बठकीत ऊस दराचा प्रश्न आणि तफावत यावर वादळी चर्चा होणार असली तरी एफआरपीनुसार दर दिला जाईलच याची खात्री सध्या तरी दिसत नाही.