एकीकडे करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने चिंता वाढत असताना दुसरीकडे करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचं प्रमाण देखील वाढलं आहे. मिरा-भाईंदर शहरातील १६१ पैकी १०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी एकाच दिवशी ५५ नागरिक करोनामुक्त झाल्याने नागरिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

मिरा-भाईंदर शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी समोर आलेल्या अहवालात चार नव्या रुग्णांची भर पडून हा आकडा १६१ वर पोहचला होता. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे उल्लंघन केल्यास हा आकडा अधिक वाढण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली होती.

परंतू, शनिवारी एकाच दिवशी पंडीत भेमसेन जोशी रुग्णालयातील ५५ रुग्ण करोनामुक्त झाल्याची दिलासादायक बाब समोर आली. त्यामुळे आत्तापर्यंत शहरातील १६१ पैकी १०० रुग्ण करोनामुक्त झाल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच नागरिकांनी घरातच राहून चिंता न करता करोनाशी लढा द्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.