औरंगाबाद महापालिका निवडणुकीत किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. सुमारे ६२ टक्के मतदान झाल्याचा प्रशासनाचा अंदाज आहे.
महापालिकेच्या १११ वॉर्डासाठी बुधवारी मतदान झाले. महिला, वयोवृद्ध व्यक्तींसह मतदारांनी उत्साहात मतदान केले. शहरातील गणेश कॉलनी भागात बनावट मतदानावर आक्षेप घेत झालेल्या हाणामारीनंतर पोलिसांच्या गाडीवरही दगडफेक झाली. या प्रकरणात पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बायजीपुरा, सुराणानगर भागात किरकोळ दगडफेक झाली, तर एक गाडीही फोडल्याने नुकसान झाले. मतदानापूर्वी शिवसेनेकडून पैसेवाटप झाल्याचा आरोप एमआयएमने केला, तो खासदार चंद्रकांत खैरे यांनी फेटाळून लावला. युतीच्या विजयाचा दावा करीत महापौरपद शिवसेनेकडेच असेल, असे खैरे यांनी सांगितले.
प्रचाराच्या रणधुमाळीनंतर बुधवारी सकाळी निवडणुकीच्या रिंगणातील ९२४ उमेदवारांसाठी मतदान करण्यास सकाळी मतदारांची अक्षरश: रांग लागली होती. विशेषत: मुस्लीमबहुल भागात अधिक मतदान नोंदविले गेले. त्याचा लाभ होतो की नुकसान, याची चर्चा काँग्रेस व एमआयएममध्ये सुरू आहे. मात्र, मुस्लीमबहुल वॉर्डामध्ये एमआयएमला काँग्रेसने चांगलीच लढत दिल्याचे कार्यकर्ते सांगत होते. शहरातील नेते खासदार खैरे, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे व इम्तियाज जलील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मतदान केल्यानंतर प्रत्येक वॉर्डात जाऊन आपल्या उमेदवाराची स्थिती काय आहे, याची चाचपणी केली. भाजप व शिवसेनेने विजयाचा दावा केला असला, तरी शिवसेनेने भाजपवर मदत न केल्याचा आरोप केला आहे. काही वॉर्डात बंडखोरांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व मुख्यमंत्र्यांची छायाचित्रेही वापरली आणि त्याला नेत्यांनी अटकाव केला नाही. भाजपने युतीचा धर्म पाळला नसल्याचा आरोप खासदार खैरे यांनी केला. ११३पैकी २ वॉर्डात शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. १११ वॉर्डासाठी मतदान झाले.