करोना काळात एक सुखद बातमी समोर आली आहे. राज्यात मागील २४ तासांमध्ये ८ हजार १८ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १ हजार १७२ इतकी झाली आहे. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट म्हणजेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.२१ टक्के झाले आहे. दरम्यान आज राज्यात ६ हजार ३३० नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात मागील २४ तासांमध्ये १२५ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.

राज्यात ज्या १२५ करोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत त्यातले ११० मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत तर उर्वरीत १५ मृत्यू हे मागील कालावधीतले आहेत. सध्या राज्यातला मृत्यू दर ४.३८ टक्के इतका झाला आहे.

आज पर्यंत राज्यात पाठवण्यात आलेल्या १० लाख २० हजार ३६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १ लाख ८६ हजार ६२६ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या ६४ शासकीय आणि ५० खासगी अशा एकूण ११४ प्रयोगशाळा कोविड १९ साठी कार्यरत आहेत.

१ जुलै २०२० पर्यंत देशात ९० लाख ५६ हजार १७३ चाचण्या झाल्या आहेत ज्यापैकी ११.२६ टक्के चाचण्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. मागील चोवीस तासांमध्ये राज्यात ६ हजार ३३० रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १ लाख ८६ हजार ६२६ इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख १ हजार १७२ बरे होऊन घरी गेले आहेत.

सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ७२ हजार ३२ लोक होम क्वारंटाइन आहेत तर ४१ हजार ७४१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ७७ हजार २६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.