महाराष्ट्रात ६ हजार २३४ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर मागील २४ तासात १९८ मृत्यू करोनामुळे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांच्या या संख्येमुळे महाराष्ट्रातील करोना एकूण करोना रुग्णांची संख्या १ लाख ९२ हजार ९९० इतकी झाली आहे. ज्यापैकी १ लाख ४ हजार ६८७ रुग्णांना आत्तापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात ८ हजार ३७६ रुग्णांचा मृत्यू करोनाची बाधा झाल्यामुळे झाला आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात ७९ हजार ९११ अॅक्टिव्ह केसेस आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

सध्याच्या घडीला राज्यात ५ लाख ८९ हजार ४४८ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४२ हजार ३७१ लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. राज्यात सध्याच्या घडीला ७९ हजार ९११ रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत असंही आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 807 रुग्ण आढळल्याने, 19 हजार 849 एवढी रुग्ण संख्या झाली आहे. तर आज दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आज अखेर 685 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या 619 रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर 12 हजार 290 रुग्ण करोना मुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.