ही घटना बिहारमधील औरंगाबादमधील नाही. तर नामांतरावरून जे शहर चर्चेत आहे, त्या औरंगाबादमधील आहे. हसीना बेगम या १८ वर्षांपूर्वी पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्या. पण, त्या थेट पाकिस्तानातील पोहोचल्या तुरूंगात. हसीना बेगम यांचा पासपोर्ट हरवल्यानं त्यांना तुरूंगात पाठवण्यात आलं. अखेर १८ वर्षांनंतर त्या पुन्हा औरंगाबादमध्ये परतल्या. औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे हसीना यांना पुन्हा स्वगृही परतता आलं.

औरंगाबादमधील रशीदपुरा येथील रहिवाशी असलेल्या हसीना बेगम यांचा उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथील दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. त्या १८ वर्षांपूर्वी हसीना बेगम पतीकडील नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेल्या होत्या. मात्र, लाहौर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचा पासपोर्ट हरवला होता. त्यानंतर त्यांना तुरूंगात पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. त्यावेळी हसीना बेगम यांनी आपण निष्पाप असल्याचं सांगत घडलेली घटना सांगितली होती. त्यानंतर पाकिस्तानी न्यायालयानं औरंगाबाद पोलिसांकडे याबद्दलची माहिती मागितली होती.

पाकिस्तानी न्यायालयाने माहिती मागितल्यानंतर औरंगाबादमधील सिटी चौक पोलिसांनी पाठवली. पोलिसांनी माहिती दिल्यानंतर हसीना बेगम यांची तुरूंगातून मुक्तता करण्यात आली. हसीना बेगम औरंगाबादमध्ये परतल्यानंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी त्यांचं स्वागत केलं. “मी प्रचंड वेदनातून गेले. मायदेशात परतल्यानंतर मला शांत वाटतं आहे. स्वर्गात असल्यासारखंच मला वाटत आहे. मला जबरदस्तीनं तुरूंगात टाकण्यात आलं होतं. या प्रकरणात माहिती दिल्याबद्दल मी औरंगाबाद पोलिसांचे खूप आभारी आहे,” अशा भावना हसीना बेगम यांनी औरंगाबादेत परतल्यानंतर व्यक्त केल्या.