देशभरात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोचल्याची वस्तुस्थिती केंद्रीय पर्यावरण व वने मंत्रालयाच्या अहवालातून स्पष्ट झाली आहे. देशात गेल्या १० वर्षांमध्ये १२ राज्यांत ६५३ लोक हिंस्र श्वापदांच्या हल्ल्यात मारले गेले, तर १७ हजार ६२ लोक जखमी झाले. संघर्षग्रस्तांना विशेष पॅकेज देण्याच्या सातपुडा फाऊंडेशनच्या मागणीची पंतप्रधानांनी गंभीर दखल घेतली आहे.
महाराष्ट्रात यंदाच्या उन्हाळ्यात दोन महिन्यांमध्ये २० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला असून, यात चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातच १२ लोक मारले गेले आहेत. एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्य़ात २००७ ते २०१३ या काळात ८३ लोकांचे आणि ५६८१ पाळीव प्राण्यांचे बळी गेले आहेत. डिसेंबर २००७ ते २०१२ या काळात महाराष्ट्रात २२३ लोक आणि २१ हजार ७७५ पाळीव प्राणी मारल्याची आकडेवारी राज्य पातळीवर उपलब्ध झाली आहे.  
जंगलतोडीचे वाढते प्रमाण वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आणत असून, त्यांना भक्ष्य आणि पाणी उपलब्ध होत नसल्याने मानवी वस्त्यांच्या दिशेने त्यांची पावले वळली आहेत. यामुळे मानवाला हिंस्र प्राण्यांपासून, तर हिंस्र प्राण्यांना मानवापासून धोका निर्माण झाला आहे.
केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाला प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार नागालँड, आंध्र प्रदेश, मिझोराम, गोवा, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, तामिळनाडू, मेघालय आणि उत्तर प्रदेशासह बारा राज्यांमध्ये हिंस्र श्वापदांनी जंगलाबाहेर पडून माणसांना लक्ष्य बनविल्याच्या घटना घडल्या आहेत.
गेल्या दहा वर्षांत मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी ६५३ असून, १७ हजारांवर लोकांना वाघ, अस्वल, बिबटय़ाने जखमी केले. या संघर्षांत हत्तींनी ११४ वाघांनी ९५ तर अस्वलांनी ५५ माणसांना ठार मारले. जखमींची संख्या विचारात घेतली तर सर्वाधिक ४४५ लोक अस्वलांच्या हल्ल्यात जखमी झाले असून, ४१९ लोक बिबटय़ाच्या हल्ल्यात जखमी झाले आहेत. यातून मानव-वन्यजीव संघर्ष आता टोकाला पोहोचल्याचे स्पष्ट दिसते.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, वरील १२ राज्यांशिवाय अन्य राज्यांकडूनही हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यातील मृत आणि जखमी लोकांची आकडेवारी मागविण्यात आली आहे. अद्यापपर्यंत तरी घनदाट जंगलांची देणगी लाभलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर या राज्यांकडून आकडेवारी पाठविण्यात आलेली नाही.
पाळीव प्राणीदेखील मोठय़ा प्रमाणात बळी पडले असून, एकूण २२ हजार ६६७ प्राण्यांचा वन्यजीवांनी फडशा पाडला आहे. यात वाघांनी सर्वाधिक १२,२८६ प्राण्यांना फस्त केले तर हत्तींनी ७,६९१ प्राण्यांना जिवानिशी मारले. हा अत्यंत गंभीर प्रश्न असल्याने पर्यावरण व वने मंत्रालयाने गुरुवारी या विषयावर दीर्घ चर्चा केली. लवकरच पुन्हा एकवार बैठक होणार असल्याचे संकेतही मंत्रालयातील सूत्रांनी दिले आहेत. या मुद्दय़ावर कदाचित संसदीय सल्लागार समितीचीही बैठक होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
केंद्रीय वन्यजीव मंडळाच्या स्थायी समितीवरील महाराष्ट्राचे प्रतिनिधी किशोर रिठे यांनी गेल्याच महिन्यात पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना एक निवेदन पाठवून हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना विशेष पॅकेज देण्याची मागणी केली आहे.

ताडोबात तीव्रता अधिक
 वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांची तीव्रता महाराष्ट्रातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरात सर्वाधिक आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये १२ लोकांचा बळी गेला असून २० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.
 बफर झोनमध्ये राहणाऱ्या भूमिहीन आदिवासी कुटुंबांसाठी आणि गुराख्यांना उपजीविकेचे पर्यायी साधन उपलब्ध करून देण्यासाठीही त्यांनी आग्रह धरला आहे.  

महाराष्ट्रात यंदाच्या उन्हाळ्यात दोन महिन्यांमध्ये २० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला असून, यात चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्प परिसरातच १२ लोक मारले गेले आहेत. एकटय़ा चंद्रपूर जिल्ह्य़ात २००७ ते २०१३ या काळात ८३ लोकांचे आणि ५६८१ पाळीव प्राण्यांचे बळी गेले आहेत. डिसेंबर २००७ ते २०१२ या काळात महाराष्ट्रात २२३ लोक आणि २१ हजार ७७५ पाळीव प्राणी मारल्याची आकडेवारी राज्य पातळीवर उपलब्ध झाली आहे.