राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्येत घट होताना दिसत नाही. रविवारी दिवसभरात आणखी रुग्णांची भर पडल्यानं राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा दोन लाखांच्या पुढे गेला आहे. यात एकट्या मुंबईतील रुग्णांची संख्या ८४ हजारांपेक्षा जास्त असून, आज दिवसभरात ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज आढळून आलेल्या रुग्णांमुळे एकूण रुग्णसंख्या दोन लाखांच्या पुढे गेली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयी माहिती दिली.

कालच्या तुलनेत आजचा दिवस राज्याचा दिवस काहीसा दिलासादायक ठरला. राज्यात दिवसभरात ६५५५ रुग्ण आढळून आले. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याविषयीची माहिती दिली. “राज्यात आज ६५५५ करोना बाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या आता २ लाख ६ हजार ६१९ इतकी झाली आहे. आज दिवसभरात ३ हजार ६५८ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण १ लाख ११ हजार ७४० रुग्ण आतापर्यंत करोनातून बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. राज्यात एकूण ८६ हजार ४० रुग्ण सध्या उपचार घेत आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईतील आकडा ८५ हजारांच्या उंबरठ्यावर

मुंबईतील रुग्णसंख्येतही दिवसभरात १ हजाराहून अधिक रुग्णांची भर पडली. दिवसभरात १३११ नवीन रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ६९ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. मु्ंबईतील करोना बाधितांची रुग्णसंख्या ८४ हजार १२५ वर पोहोचली असून, यापैकी ५५ हजार ८८३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबई महापालिकेनं ही माहिती दिली आहे.