जालना लोकसभा मतदारसंघात ६६.२० टक्के मतदान झाले. मागील वेळेस हे प्रमाण ५५.९७ टक्के होते. भोकरदन विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७१.४३ टक्के, तर जालना विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी ५४.१० टक्के मतदान झाले.
जालना विधानसभा क्षेत्राचा जवळपास ८५ टक्के भाग शहरी आहे. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागातील मतदानाची टक्केवारी कमी राहिली. सर्वाधिक मतदान झालेल्या भोकरदन विधानसभेचे क्षेत्र भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. मागील निवडणुकीत भोकरदनमध्ये दानवे यांना ४ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य होते. जालना विधानसभा क्षेत्रात मागील निवडणुकीत ४१ टक्केच मतदान झाले होते. या वेळेस जालना विधानसभा क्षेत्रात १३ टक्क्य़ांनी मतदान वाढले. जालना विधानसभा क्षेत्र काँग्रेससाठी अनुकूल मानले जाते. मागील निवडणुकीत येथून जवळपास १५ हजारांचे मताधिक्य मिळाले होते. या वेळेस जालना विधानसभा क्षेत्रात ८६ हजार ३२ पुरुष, तर ६७ हजार ६९ महिला मतदारांनी मतदान केले.
बदनापूर विधानसभा क्षेत्रात १ लाख ७९ हजार १६६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात ७९ हजार १२९ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानाचे प्रमाण ६६.६० टक्के आहे. सिल्लोड विधानसभा क्षेत्रात ६७.३८ टक्के, फुलंब्रीत ६८.७६ टक्के व पैठणमध्ये ६९.९२ टक्के मतदान झाले.
मतदानाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांनी अंदाज बांधण्यास सुरुवात केली आहे. वाढलेल्या मतदानाचा फायदा भाजपाला होईल की काँग्रेसला, याकडे चर्चेचा रोख आहे. भोकरदनमध्ये वाढलेल्या मतदानाचा लाभ दानवे की औताडे यांना, याकडेही चर्चेचा केंद्रबिंदू आहे. फुलंब्री विधानसभा क्षेत्रात मागील वेळी दानवे यांना १३ हजार ६१८ चे मताधिक्य मिळाले. या वेळेस फुलंब्रीत ६८.७६ टक्के मतदान झाले. वाढलेल्या मतदानाचा लाभ कोणत्या उमेदवारास, याची उत्सुकता आहे. फुलंब्री क्षेत्रावर दोन्ही प्रमुख उमेदवारांच्या समर्थकांनी लक्ष केंद्रित केले होते.