19 September 2020

News Flash

डॉक्टरांनी ‘नी रिप्लेसमेंट’चा सल्ला दिलेला असतानाही त्यांनी सर केला दौलताबादचा किल्ला

इच्छा तेथे मार्ग असं म्हणतात याचेच हे उदाहरण आहे असं म्हणता येईल

मंगला साळुंखे

इच्छा असली की मार्ग सापडतोच असं म्हणतात. अनेकजणांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची इच्छाच नसते त्यामुळे ते प्रयत्न न करता हार मानतात. मात्र काहीजण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर आपल्याच मर्यादा ओलांडून अशक्य वाटणारी गोष्ट मिळवतात. असाच एक किस्सा औरंगाबादमध्ये आयकर अधिकारी म्हणून काम करणाऱ्या संदीपकुमार साळुंखे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर संदीपकुमार यांच्या आईने दौलताबाद किल्ला सर केला. विशेष म्हणजे नी रिप्लेसमेंटचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मंगला साळुंखे यांनी ६६ व्या वर्षी हा आगळावेगळा पराक्रम केला आहे.

मागील १५ वर्षांपासून संदिपकुमार यांच्या आईंना गुडघ्यांचा त्रास आहे. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी युट्यूबवर दौलताबाद किल्ल्याचा एक व्हिडिओ पाहिला आणि त्यांनी किल्ल्यावर जाण्याची इच्छा आपल्या मुलाकडे आणि सुनेकडे बोलून दाखवली. त्याप्रमाणे सर्वजण किल्ला पहाण्यासाठी निघाले. मुळात दौलताबादच्या किल्ल्याच्या गेटपासून ते तटबंदीपर्यंत चालत जाण्याचे अंतर खूप जास्त आहे. ते अंतर चालून गेल्यानंतरही आईचा उत्साह कायम होता आणि तिने पुढे चालत जाण्याचे ठरवल्याचे संदीपकुमार यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना सांगितले. पुढे चालत जाताना किल्ल्यांच्या पायऱ्या असमान होत जातात. शत्रूंना चकवा देण्यासाठी अशापद्धतीचे रचना केलेली असल्याने या पाऱ्या चढून जाणे सामान्यांनाही थोडे अवघड जाते. मात्र मंगला यांनी हा टप्पाही पार करत किल्ल्यावरील खंदक पार करून अंधेरी म्हणजे भुलभुलय्यापर्यंत चढून गेल्या. याबद्दल संदीपकुमार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात, ‘माझी आई सहासष्ट वर्षांची आहे आणि तिला गुडघ्यांचा जबरदस्त प्रॉब्लेम आहे. तिने युट्युबवर दौलताबाद किल्ल्याचा एक व्हिडिओ पाहिला होता आणि म्हणून किल्ला पहायची तिची इच्छा होती. आधी मी आणि सौ. मोनाली पूर्ण किल्ला पाहून आलो आणि नंतर आईला न्यायचे असे ठरले. आम्हाला शंका होती की किल्ल्यात ती किती वरपर्यंत चढू शकेल. फारफार तर हत्ती हौद पर्यंत आई चालू शकेल असे आम्हाला वाटले होते पण आईला जेंव्हा किल्ल्यावर नेले तेव्हा ती चक्क खंदक पार करून अंधेरी म्हणजे भुलभुलय्या पर्यंत चढून आली. तिला पाहून आजूबाजूच्या अनेक पर्यटकांनाही आश्चर्य वाटत होते की आजी इतक्यात दूरपर्यंत एवढ्या मोठाल्या पायर्‍या चढून आणि चढण पार करुन कश्या काय पोहोचला शेवटी इच्छा तेथे मार्ग हेच खरे.’

मंगला यांना भुलभुलय्यापर्यंत जाऊन परत यायाला दोन ते अडीच तास लागल्याची माहिती संदीपकुमार यांनी दिली. ‘आईला किल्ल्यावर पोहचल्यानंतर आत्मिक समाधान मिळाले. केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर ती इथपर्यंत जाऊ शकली. हे असे क्षण म्हणजे स्वत: स्वत:वर मिळवलेला विजय असतो. आपण हे करु शकतो करु शकत नाही अशा मर्यादा स्वत:लाच घालतो. असं काहीतरी आपण करतो तेव्हा आपण आपल्याच मर्यादा ओलांडून काहीतरी मिळतो तो आनंद खास असतो कारण तुम्ही तेव्हा स्वत:च्या मर्यादांवर विजय मिळवता,’ असं संदीपकुमार म्हणाले. दौलताबादचा किल्ला चढून गेल्याने मंगला यांचा विश्वास वाढला असून इतर किल्ल्यांवर जाण्याचाही त्यांचा मानस आहे. पुण्यात बदली होईल तेव्हा शिवाजी महाराजांचे प्रमुख किल्ल्यांवर आईला नक्की घेऊन जाण्याचा मानस आहे असंही संदीपकुमार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 4:54 pm

Web Title: 66 year old lady goes to daulatabad fort even after having knee problem
Next Stories
1 नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
2 दोन-तीन आठवडय़ांच्या प्रतीक्षेनंतर एक वेळ पाणीपुरवठा!
3 कृषी कर्जाच्या पुरवठय़ावर मर्यादा!
Just Now!
X