19 October 2019

News Flash

हरित पालघरचे स्वप्न टप्प्यात ; जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड

पालघर जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे.

पालघर : राज्य सरकारने यंदाच्या वर्षी ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याचा भाग म्हणून पालघर जिल्ह्य़ात ६९ लाख वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. मूळ उद्दिष्टांपैकी ८५ टक्के इतका टप्पा गाठण्यात आला आहे. पाऊस थांबल्यानंतर १५ लाख तिवरांची लागवड केली जाईल. त्यामुळे येत्या काळात हरित पालघरचे स्वप्न सत्यात उतरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वनीकरणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात पालघर जिल्ह्य़ासाठी ८२ लाख वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी वेगवेगळ्या शासकीय विभागांच्या सहभागातून आजवर सुमारे ६९ लक्ष वृक्ष लागवड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. यापैकी सुमारे २८ लाख झाडे वनविभागाने लावली आहेत. वनविभागाच्या संलग्न संस्थांकडून ११ लाख, विविध ग्रामपंचायतीकडून १५ लाख, नगरपालिकाकडून दीड लाख, तर ग्रामीण आणि शहरी विकास विभागांकडून प्रत्येकी एक लाख, कृषी विभागाकडून दोन लाख ८० हजार, आदिवासी विकास विभागाकडून आणि महसूल विभागाकडून प्रत्येकी सुमारे ८५ हजार अशा प्रकारे वृक्ष लागवड करण्यात आली आहे. लावलेल्या सर्व झाडांचे भूमापन (जिओ टॅगिंग) करण्यात आले आहे. लागवड केलेल्या सर्व वृक्षरोपांची माहिती शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याशिवाय विरार-वसई पालिकेने सुमारे दोन लाख वृक्ष लागवड करून ‘थीम पार्क’ची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे.  २०१६पासून वृक्षरोपांच्या लागवडीचा कार्यक्रम जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. याआधी लावलेल्या वृक्षरोपांपैकी ८० टक्के रोपांची झाडांपर्यंत वाढ झाली.

यंदाच्या हंगामात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर डहाणू उपवन विभागात समुद्र किनारी १५ लाख तिवरांची लागवड केली जाणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर शासनाने नेमून दिलेली उद्दिष्टपूर्ती पूर्ण होईल, असे पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.

वसईत कृत्रिम जंगल

वसई-विरार महापालिकेने शहरात कृत्रिम जंगल तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. पाच वर्षांचा हा प्रकल्प असून तिसऱ्या टप्प्यात यंदाच्या पावसाळ्यात पालिकेने पावणेदोन लाख वृक्षरोपांची लागवड केली आहे.  पालिकेन कृत्रिम जंगलच तयार करून त्यात पर्यटनासाठी विविध प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले आहे. यासाठी वनविकास महामंडळातर्फे वृक्ष लागवडीचे काम हाती घेण्यात आले होते. यासाठी पालिकेने वनविभागाशी करार केला आहे. पाच वर्षांत ही वृक्ष लागवड केली आहे. सात वर्षे या वृक्षरोपांची वनविभागाच्या वतीने देखभाल केली जाणार आहे. पावसाळ्यात जी झाडे जगू शकतील, अशीच झाडे लावण्यात येणार आहेत. यातून पाणी बचत होणार आहे. या ठिकाणी पर्यटन स्थळ, फॉरेस्ट पार्क, पक्षी अधिवास, हरिण पार्क, औषधी वनस्पती उद्याने विकसित केली जाणार आहेत.

First Published on September 17, 2019 3:40 am

Web Title: 69 lakhs tree plantation in palghar district zws 70