रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि पनवेल मॅरेथॉन कमिटी यांच्यातर्फे रविवार १३ जानेवारी रोजी ‘खारघर मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले असून एकूण सहा लाख रुपयांची बक्षिसे हे या शर्यतीचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. गेली सहा वर्षे होणाऱ्या या शर्यतीचे प्रथमच खारघरमध्ये आयोजन करण्यात आले आहे. खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलपासून सकाळी ७.०० वाजता या मॅरेथॉनला सुरुवात होणार आहे. ‘स्त्रीभ्रूण हत्येविरोधात एक धाव’ या घोषवाक्याखाली आयोजित करण्यात आलेली ही मॅरेथॉन एकूण १३ गटांत होणार आहे. यात २१ किमी पुरुष खुला गट, ११ किमी महिला खुला गट, ११ किमी १९ वर्षांखालील मुलांचा गट आदी गटांचा प्रामुख्याने समावेश आहे. यात ज्येष्ठ नागरिकांसाठीही एक विशेष गट ठेवण्यात आला आहे. या मॅरेथॉनला दरवर्षी हजारो स्पर्धकांचा प्रतिसाद लाभतो. यंदा त्यापेक्षाही अधिक प्रतिसाद लाभेल, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.