वाई तालुक्यातील बोपर्डी आणि लोहारे या लगतच्या गावातील महाविद्यालयीन युवकांमधील वादावादीनंतर शुक्रवारी रात्री जोरदार धुमश्चक्री झाली. या मारामारीत सात जण जखमी झाले असून दोन्ही गावांतील २८ जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या परिसरातील वातावरण तणावपूर्ण आहे. वाई उपविभागातील सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते.
बोपर्डी व लोहारे (ता वाई ) येथील युवकांची वाईत शुक्रवारी दुपारी महाविद्यालय, एस टी स्टँड परिसरात वादावादी झाली होती. ही दोन्ही गावे लगतच्या शिवधडीची असून पूर्वीपासून या दोन्ही गावांत किरकोळ स्वरूपात वादावादी होत असे. मांढरदेव मार्गावर जाणाऱ्या एस टी बस मधून जाताना दोन्ही गावातल्या युवकांमध्येही वाद होत असतात. परंतु ते गावातील ज्येष्ठ लोकांव्दारे मिटविले जात असत. शुक्रवारी दुपारी झालेल्या वादावादीनंतर ती मिटविण्यात आली होती. शुक्रवारी लोहारे गावात सायंकाळी एक कार्यक्रम होता. यावेळी बोपर्डीचे युवक भांडणाबाबत लोहारेत विचारणा करण्यासाठी गेले असता दोन्ही गावांतील युवकांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यातून मारामारी झाली. ही माहिती बोपर्डीत समजताच बोपर्डीतून मोठय़ा संख्येने युवक लोहारे गावात गेले. दोन्ही गावांत रात्री साडेदहा अकराच्या सुमारास जोरदार धुमश्चक्री झाली. गाडय़ांची मोडतोड करण्यात आली. या धुमश्चक्रीत दोन्ही गावांतील सात जण जखमी झाले. यातील तिघांची प्रकृती गंभीर असून त्यांना वाई व सातारा येथील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
या दोन्ही गावांची शिव एकच आहे. त्यामुळे दोन्ही गावांतील युवक, अल्पवयीन मुले, महिला सर्वच भांडणात उतरल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाई पोलीस घटनास्थळी पोहोचले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वाईचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यानी ही बाब वरिष्ठांना कळवताच सातारा मुख्यालयातून शंभरावर पोलीस कर्मचारी, दोन पोलीस निरीक्षक यांसह वाई, भुईज खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी, मेढा या वाई उपविभागातील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. पोलीस उपअधीक्षक एस. राकेश, कलासागर उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक हुंबरे ही घटनास्थळी दाखल झाले. मध्यरात्रीच्या सुमारास परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. याप्रकरणी बोपर्डीतील तीन अल्पवयीन युवकांसह अठरा जणांना तर लोहारेतील दोन अल्पवयीन मुलांसह दहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्वाची न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली असून या सर्वावर गर्दी जमविणे, मारामारी करणे व जिवे मारण्याचा प्रयत्न करण्याकामी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही गावात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. परिस्थिती तणावपूर्ण परंतु नियंत्रणात आहे.