20 October 2020

News Flash

मोहरमसाठी निघालेल्या सात जणांवर काळाचा घाला

मोहरमसाठी धापेवाडा येथील दग्र्यात जाणाऱ्यांच्या ऑटोला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली.

प्रातिनिधिक छायाचित्र

वरोडय़ाजवळ भरधाव ट्रकची ऑटोला धडक, तिघे गंभीर

नागपूर : मोहरमसाठी धापेवाडा येथील दग्र्यात जाणाऱ्यांच्या ऑटोला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात सात जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात आज गुरुवारी दुपारी कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडा परिसरात घडला.

फातिमा बेगम मोहम्मद रफीक खान (४०) रा. मोठा ताजबाग, साहिदाबी शेख नजीर (६७), मोहम्मद रियाल मोहम्म युनूस (८), पज्जू शेख शकील शेख (५) सर्व रा. मोठा ताजबाग, असमा परविन तौसिफ मोहम्मद खान (२०), नाजीम मोहम्मद मोहम्मद खान (दीड वर्षे), माहिम मक्तूम मोहम्मद तौसिफ खान (अडीच वष्रे) सर्व रा. हैदराबाद अशी   मृतांची, तर शेख हसन शेख नजीर (३२), शेख हुसेन शेख नजीर (३२), नसरिन बेगम मौहम्मद युनूस (३५) आणि कुबरा बानो आरिफ खान (३२) सर्व रा. मोठा ताजबाग अशी जखमींची नावे आहेत.

मृत व जखमी हे साहिदाबी शेख नजीर यांच्या परिवारातील आहेत. साहिदाबी यांनी हैदराबाद येथील मुलगी व जावयांना त्यांच्या कुटुंबासह मोहरमसाठी नागपुरात बोलावले होते. ते दोन दिवसांपूर्वी नागपुरात आले. आज दुपारी तीन ऑटोमधून धापेवाडा येथे जाण्यासाठी निघाले. शेख हुसेन चालवत असलेल्या ऑटोमध्ये दहाजण बसले होते. वरोडा परिसरात भरधाव ट्रकने ऑटोला जोरदार धडक दिली. त्यात पूर्ण ऑटो चक्काचूर झाला. यात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. माहिती मिळताच कळमेश्वरचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर बहादुरे हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले व रुग्णवाहिकेतून पाच जखमींना मेयो रुग्णालयात हलवले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मोहम्मद सियाल व साहिदाबी यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.

मुलाला कडेवर घेऊन वडील रुग्णालयात

सर्वात शेवटी असलेल्या ऑटोमध्ये मोहम्मद युनूस बसले होते. मात्र, त्यांची पत्नी नसरिन बेगम व मुलगा मोहम्मद सियाल हे अपघात झालेल्या ऑटोमध्ये होते व गंभीर जखमी झाले होते.  रुग्णवाहिका पोहोचताच मुलाला कडेवर घेऊन ते तिकडे धावले, परंतु रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला होता. पत्नीची अजूनही मृत्यूशी झुंज सुरू आहे. या अपघातात मोहम्मद तौसिफ खान यांची पत्नी, एक मुलगा व मुलचाही मृत्यू झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2018 3:34 am

Web Title: 7 killed in road accident in nagpur
Next Stories
1 ‘ती’ अडीच महिने झुंजली, पण अपयशीच ठरली!
2 सत्तापक्ष नेत्यांकडे ‘डेंग्यू’च्या अळ्या
3 नागपूरकरांना लागला सायकलिंगचा लळा!
Just Now!
X