जिल्हय़ातील सरकारमान्य व परवानाधारक ताडी विक्री दुकानातील ताडीमध्ये मानवी शरीरासाठी घातक असलेला ‘क्लोरल हायड्रेट’ हा विषारी पदार्थ आढळला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने मार्च-एप्रिलमध्ये केलेल्या तपासणीत ही बाब आढळून आली आहे. या दुकानातून घातक विषारी रसायनांपासून तयार केलेली ताडी विकली जात होती. अशा सात दुकानांचे परवाने जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अहवालानंतर रद्द केले आहेत.
घातक विषारी रसायन आढळूनही विक्रेत्यांवर फौजदारी स्वरूपाच्या कारवाईऐवजी केवळ परवाने रद्दची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हय़ात ताडी विक्रीची एकूण २१ परवानेधारक दुकानदार आहेत. त्यातील सात दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. आणखी एका दुकानदारावरील प्रस्ताव प्रलंबित आहे. परवाने रद्द केलेल्यांमध्ये नगर शहरातील चार दुकाने आहेत. यातील काही विक्रेते आंध्र प्रदेशातील आहेत.
रमेश परसय्या करमलू यांचे नगर शहराच्या श्रमिकनगर व माळीवाडा भागातील तसेच जामखेड येथील, देवा नारायण गौड यांचे नगरच्या तोफखाना भागातील व भिंगारमधील मल्लेश ओच्चा रंगागौड यांचे राहुरीतील व अकोल्यातील संतोष जानू आव्हाड यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तपासणीत ताडीत क्लोरल हायड्रेट या घातक रसायनांसह सॅक्रीन व स्वीटनर हे पदार्थही आढळले आहेत. त्यामुळे ताडी कृत्रिमरीत्या तयार करून विकली जात होती, यावर प्रकाश पडला. परवाने रद्द करण्यात आलेल्या दुकानांतील ताडीमध्ये घातक रसायन आढळल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासन विभागाने दिल्याच्या माहितीला जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्कच्या अधीक्षकांनी दुजोरा दिला.
ताडी विक्रीच्या परवान्यांसाठी दरवर्षी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत लिलाव आयोजित केले जातात. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया राबवली जाते. मागील वर्षी ऑगस्टमध्ये लिलाव झाले होते. उन्हाळय़ात ताडी विक्री उच्चांक गाठत असते. शहरी भागातही अनेक जण शरीरासाठी उत्साहवर्धक नैसर्गिक पेय म्हणून ताडीचा वापर करतात. नगर शहरातील अनेक भागांत सकाळी ताडी विक्री केली जाते.
फौजदारी कारवाईची मागणी
ताडीमध्ये शरीराला घातक, विषारी रसायन मिसळले जात असल्याचा अहवाल अन्न व औषध प्रशासन विभागाने सन २०११ पासून वेळोवेळी दिलेले आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाने आत्तापर्यंत कोणतीही कारवाई केली नाही. यासाठी अनेक वेळा निवेदनेही देण्यात आली होती. आता केलेली कारवाईही जुजबी स्वरूपाची आहे. केवळ परवाने रद्द न करता अशा विक्रेत्यांवर फौजदारी स्वरूपाचीच कारवाई व्हायला हवी, अशी मागणी नागरिक कृती मंचचे अध्यक्ष शशिकांत चंगेडे यांनी केली आहे.
विक्री सुरूच
परवाने रद्द करण्यात आले असली तरी नगर शहरातील ताडी विक्रीची दुकाने आज, सोमवारी सुरूच होती, असे या भागातील नागरिकांकडून सांगण्यात आले. त्यामुळे कारवाई होऊनही घातक, विषारी ताडीची विक्री सुरूच असल्याचे स्पष्ट होते.