वेदांत तीन दिवसांपूर्वी तो गच्चीवर पतंग उडवत असताना त्याच्या मानेला मांजा गुंडाळला गेला.

अमरावती : पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या चायना नावाने ओळखल्या जाणाऱ्या मांजाने सातवर्षीय चिमुकल्याचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना धामणगाव रेल्वे तालुक्यातील वसाड येथे घडली.

वेदांत पद्माकर हेंबाडे (७) असे चिमुकल्याचे नाव आहे. तो धामणगाव रेल्वे शहरात हरिबाई प्राथमिक मराठी शाळेत इयत्ता पहिलीत शिकत होता. हेंबाडे कुटुंबीय मुलांच्या शिक्षणासाठी धामणगाव रेल्वे शहरात वास्तव्यास असून पाण्याच्या टाकीजवळ भाडय़ाने राहतात. वेदांत हा पतंग उडवण्याचा हट्ट करीत असल्याने वडिलांनी त्याला पतंग व मांजा आणून दिला. तीन दिवसांपूर्वी तो गच्चीवर पतंग उडवत असताना त्याच्या मानेला मांजा गुंडाळला गेला. मान कापल्याने गंभीर जखम झाल्यामुळे वेदांतला अमरावती येथे खासगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले होते.

त्यानंतरही जखम चिघळल्याने रविवारी रात्रीच्या सुमारास वसाड गावाहून अमरावती येथे उपचाराकरिता नेण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला. मृत वेदांतच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याची अभ्यासात चांगली प्रगती होती.

बंदी असूनही चायनीज मांजाची विक्री

बंदी असतानाही बाजारपेठेत चायनीज व नायलॉन मांजाची धडाक्यात विक्री सुरू असल्याने या घातक मांजावरील बंदी ही केवळ कागदावरच ठरत आहे. मकर संक्रांती दरम्यान बाजारपेठेत मांजा व पतंग खरेदीसाठी गर्दी झाली आहे; मात्र पतंगप्रेमींमध्ये चिनी व नायलॉन मांजाची मागणी वाढली आहे. गेल्यावर्षी देखील मांजामुळे अनेक अपघात झाल्यानंतरही यंदा या मांजाची मागणी होत आहे; परंतु हा मांजा नागरिकांसह पशुपक्ष्यांच्या गळ्याचा फास ठरत आहे. नागरिकांना चालताना किंवा वाहन चालवताना जीव मुठीत घेऊ न रस्त्याने जावे लागते. अनेक पक्षी, प्राणी, मनुष्य जखमी किंवा प्रसंगी मृत्युमुखी पडतात.

राज्य सरकारने १९८६ पर्यावरण संरक्षण कायदा कलम ५ नुसार मांजाची विक्री व वापरावर बंदी घातली आहे. दरवर्षी याबाबत विविध संस्था संघटनांकडून जनजागृती केली जाते; मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने बाजारपेठेत नायलॉन मांजाची सर्रास विक्री सुरू आहे. नायलॉन मांजासोबतच प्लास्टिकच्या पतंगांचीही मोठी उलाढाल सुरू आहे. राज्यात प्लास्टिकला बंदी असतानाही प्लास्टिकपासून निर्मित पतंगांची धडाक्यात विक्री सुरू आहे.