देशात शैक्षणिक क्षेत्रात प्रसिध्द असलेल्या राजस्थानातील कोटा येथे टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळे विभागाच्या ७० बसगाडय़ा कोटाकडे रवाना झाल्या.

महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी कोटामध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांंना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी राज्य सरकारला विनंती केली होती. टाळेबंदीमुळे कोणालाही दुसऱ्या राज्यात काय, परंतु दुसऱ्या जिल्ह्यातही पूर्वपरवानगीशिवाय जाता येत नाही. अशा परिस्थितीत परराज्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी केंद्र शासन आणि राजस्थान सरकारशी चर्चा केली. महाराष्ट्राच्या उत्तर सिमेवरील आणि कोटाजवळचा जिल्हा म्हणून धुळ्यातून बसगाडय़ा सोडण्याचे नियोजन राज्य सरकारने केले. महसूल राज्यमंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी परिवहनमंत्र्योंशी चर्चा करुन धुळे आगाराच्या ७० बस उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार बुधवारी धुळ्याहून ७० बस कोटाकडे रवाना झाल्या. दोन दिवसांत या गाडय़ा विद्यार्थ्यांना घेवून महाराष्ट्रात परत येतील.

धुळे ते कोटा हे अंतर ६३० किलोमीटर आहे. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना स्वसंरक्षणासाठी राज्य परिवहनने मास्क, सॅनिटायझर दिले आहे. सर्व गाडय़ाही र्निजतूक करण्यात आल्या आहेत. या बस मंदसौर, रतलाममार्गे कोटा (राजस्थान) येथे पोहचतील. धुळ्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी संजय यादव, धुळ्याच्या विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी या प्रक्रियेसाठी सहकार्य केले. अनेक दिवसांपासून परराज्यात शिक्षणासाठी गेलेल्या आणि टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांचा यामुळे आपल्या गावी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

घरखर्चातून बचत केलेली रक्कम पोलीस कल्याण निधीत

करोनाविरूध्द लढणाऱ्या पोलिसांच्या मदतीसाठी आता धुळ्याच्या कॉलनी परिसरातील गृहिणी सरसावल्या आहेत. महिलांनी घर खर्चातून बचत केलेले सात हजार शंभर रूपये पोलीस कल्यण निधीसाठी दिले. दत्तमंदिर परिसरातील सार्थक अपार्टमेंट आणि राजाराम रेसिडन्सी येथील ममता पाटील, पूनम सोनवणे, शितल बिऱ्हाडे, रेखा पोद्दार, कल्पना बोढरे, अश्विनी नेरकर, भावना भदाणे, राजश्री बडगुजर, शैला पाटील, मनिषा अमृतकर, जया जाधव यांनी पोलिसांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. रकमेचा धनादेश दत्त कॉलनीतील महिलांनी पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे आणि देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय सानप यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना महिलांच्या वतीने निर्जंतुकीकरणासाठी रसायनाच्या बाटल्याही भेट देण्यात आल्या.रुपयांच्या रकमेचा धनादेश पोलीस उपअधीक्षक सचिन हिरेंना सोपविला. यावेळी निरीक्षक संजय सानप हेही उपस्थित होते.

धुळ्यात पाच करोनाग्रस्तांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे बुधवारी पहाटे  ८० वर्षांच्या करोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. करोनाचा हा जिल्ह्यातील पाचवा, तर साक्रीतील दुसरा बळी आहे. धुळ्याच्या देवपूर भागातील एकता सोसायटीत राहणारी ६० वर्षांची महिला करोनाबाधित झाली असून संबंधित महिला आणि तिच्या परिवारातील काही सदस्य हे नाशिक येथे विलगीकरणात आहेत. जिल्ह्यात १० एप्रिल रोजी साक्री येथे पहिला करोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. मृत्यूनंतर त्या रुग्णाचा अहवाल सकारात्मक आल्याने तो जिल्ह्यातील करोनाचा पहिला बळी ठरला होता. १० ते २९ एप्रिल या १९ दिवसात करोनाचा जिल्ह्यात वेगाने फैलाव झाला आहे. करोनाबाधितांची संख्या २५ झाली आहे. साक्रीतील ८० वर्षांच्या वृध्दाला काही दिवसांपूर्वी धुळ्यातील सर्वोपचार रुग्णालयाच्या कोविड-१९ कक्षात दाखल करण्यात आले होते. बुधवारी पहाटे त्यांचा मृत्यू झाला. त्यांना हृदयविकाराचाही त्रास होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, नगांवबारी परिसरातील एकता सोसायटीत राहणारी महिला हृदयरोगाच्या उपचारासाठी नाशिक येथे एका खासगी रुग्णालयात दाखल झाली होती. या महिलेला करोनाची लागण झाली असल्याचा अहवाल नाशिक जिल्हा आरोग्य विभागाने धुळे महापालिका प्रशासनाला कळवला. त्यानंतर खबरदारी म्हणून ती महिला राहत असलेला एकता सोसायटीचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आला आहे.