शहरातील बौद्ध समाज स्मशानभूमीसाठी ७० लाख रुपये निधी देण्यास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच दलितवस्तीतील कामाच्या प्रस्तावास मान्यता देऊन ५० टक्के निधी देण्याचे मान्य केले. शहरातील पत्रकारांना घर बांधण्यासाठी दोन एकर जागा देण्याचा ठरावही सर्वानुमते घेण्यात आला.
महापौर प्रताप देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित सभेला आयुक्त अभय महाजन, प्रभारी नगरसचिव चंद्रकांत पवार, विरोधी पक्षनेते भगवान वाघमारे, उपायुक्त रणजित पाटील उपस्थित होते. सभेत दलितोत्तर विकास निधीअंतर्गत ४ कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या कामांना मंजुरी देण्यात आली. रस्ता सुशोभीकरण, उद्यान विकास, नाली बांधकाम आदी कामे मंजूर झाली. धाररस्ता येथे बौद्ध समाज स्मशानभूमीसाठी ७० लाख निधी देण्यास मंजुरी देण्यात आली. िलगायत समाज स्मशानभूमीसाठीही निधी दिला जाईल, असे सांगण्यात आले. दलितवस्तीत २०१४-१५मध्ये ३ कोटी ६४ लाख मंजूर केल्याची माहिती देण्यात आली. या वेळी प्रत्येक समाजातील स्मशानभूमीसाठी निधी देण्याची मागणी नगरसेवकांनी केली.
शहरातील पत्रकारांना घर बांधण्यासाठी धार रस्ता येथील दोन एकर जागा देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यामुळे मराठी व उर्दू पत्रकारांना घर बांधणीसाठी जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विरोधी पक्षनेते वाघमारे, डॉ. विवेक नावंदर, डॉ. जावेद कादर, गुलमीर खान, अंबिका डहाळे, अनिता सोनकांबळे, सचिन देशमुख, युनूस सरवर, सुनील देशमुख, शिवाजी भरोसे, शांताबाई लंगोटे, संगीता कलमे, संगीता वडकर, रजिया बेगम आदींनी सहभाग घेतला.
यंदा परभणी फेस्टीव्हल नाही
दुष्काळसदृश स्थितीमुळे महापालिकेच्या वतीने होणारा परभणी फेस्टीव्हल रद्द करण्यात आल्याची माहिती महापौर देशमुख यांनी सभेत दिली. परभणी फेस्टीव्हल रद्द होत असल्यामुळे महापालिकेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात आली.