राज्यात बहुतांश ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाल्याने सर्वच धरणांतील पाणीसाठा ६ टक्क्यांनी वाढला असून, आता तो ७० टक्के झाला आहे. विशेष म्हणजे मराठवाड्यातील धरणांमध्ये देखील ८ टक्क्यांनी पाणीसाठा वाढला असून, जायकवाडी धरण २७ टक्के भरले आहे. ९७ टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे.
राज्यात आजपर्यंत सरासरीच्या ७४ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील नांदेड आणि चंद्रपूर या २ जिल्ह्यांत २६ ते ५० टक्के, रायगड, नाशिक, नंदूरबार, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या १८ जिल्ह्यांत ५१ ते ७५ टक्के. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, जळगाव, अमरावती, वर्धा, नागपूर या ७ जिल्ह्यांत ७६ ते १०० टक्के आणि ठाणे, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली या ६ जिल्ह्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
राज्यातील १३८ तालुक्यांमध्ये टंचाईसदृष्य परिस्थिती अद्याप कायम असून, तिथे कृषी पंपांच्या चालू वीज बिलांमध्ये ३३ टक्के सवलत, शालेय विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफी, शेतसारा माफी अशा सवलती देण्यात आल्या आहेत.
धरणात ७० टक्के पाणी साठा
राज्यातील जलाशयात ७० टक्के साठा असून, गेल्या वर्षी याच सुमारास ७८ टक्के पाणी साठा होता. मराठवाड्यातील सर्व प्रकल्पांत आता २७ टक्के पाणीसाठा असून कोकणातील प्रकल्पांत ९३, नागपूर ७१ अमरावती ५६, नाशिक ६४ आणि पुणे ८७ टक्के असा पाणीसाठा आहे.