कर्जत तालुक्यातच नव्हे तर रायगड जिल्ह्य़ामधील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावल्यामुळे शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कर्जत तालुक्यातील २८१ शाळांपकी सत्तर शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट २० सुद्धा नाही. काही गावातील शाळेचा पट शून्य आहे. तरीही शिक्षकांचे वेतन सुरू ठेवावे लागते. शासनाला नाहक प्रचंड आíथक भरुदड पडतो. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद कराव्यात असा शासनाचा विचार आहे. तसा आदेश आल्यास या शाळा कधीही बंद होतील. दिवसेंदिवस पालकांचा ओढा खासगी किंवा इंग्रजी शाळांमधून आपली मुले शिकली पाहिजेत याकडे आहे. बहुतांश गावांजवळ तशा शाळा सुरू झाल्याने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांना टाकण्यात पालकांची इच्छा नसते. म्हणून अशी परिस्थिती ओढावली आहे.   कर्जत तालुक्यात २८१ शाळा आहेत.  २१ केंद्र प्रमुख शिक्षक मंजूर असताना सतरा कार्यरत आहेत. पदोन्नती मुख्याध्यापक ३१ मंजूर असताना पन्नास कार्यरत आहेत. ६४६ उपशिक्षक मंजूर असताना ७३१ कार्यरत आहेत. १८५ पदवीधर शिक्षक मंजूर असताना केवळ ५१ पदवीधर शिक्षाकच कार्यरत आहेत. असे ८३२  शिक्षक कार्यरत आहेत. अतिरिक्त मुख्याध्यापक ३१ आहेत. अतिरिक्त उपशिक्षक ११० आहेत. एकही पदवीधर शिक्षक अतिरिक्त नाही. या उलट रिक्त मुख्याध्यापकांची संख्या १३ आहे. रिक्त उपशिक्षकांची संख्या २५ आहे आणि रिक्त पदवीधर शिक्षकांची संख्या १३४ आहे. ही आकडेवारी २०१५-२०१६ ची असल्याचे गट शिक्षण अधिकारी सुरेश डंबाये यांनी सांगितली. नुकतेच मुख्याध्यापक, शिक्षकांचे समायोजन झाल्याचेही सांगितले. २८१ शाळांपकी ७० शाळांमधील विद्यार्थीपट वीसपेक्षा कमी आहे. गारपोली गावातील शाळेचा विद्यार्थीपट शून्य आहे. अशा शाळा शिक्षणाच्या अधिकारांतर्गत बंद करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. तसे घडल्यास त्या सत्तर शाळा कधीही बंद होऊ शकतात. त्यामुळे तेथील शिक्षकांचे काय करायचे? असा प्रश्नसुद्धा समोर येईल.

खरे तर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना वेतन चांगले आहे. काही शाळांमध्ये चार किंवा पाच विद्यार्थी आहेत. शिक्षक दोन आहेत. त्यांच्या वेतनाचा विचार केल्यास त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी किती खर्च येतो ते दिसते. आणि इतका खर्च करावा की शाळा बंद कराव्यात हे शासनाला ठरवावे लागेल. काही शिक्षक विद्यार्थी कमी असल्याने आपापसात अ‍ॅडजेस्टमेंट करतात असेही निदर्शनास आले आहे. तर काही वेळेआधीच निघून रेल्वे स्थानकावर दिसण्याचे प्रमाणसुद्धा खूप आहे. असे आमसभेत निदर्शनात आणून दिले. त्यावर उपायसुद्धा करण्यात आला होता. तो कितपत यशस्वी झाला. त्याचे संशोधन करावे लागेल. कर्जत तालुका जाण्यायेण्याच्या दृष्टीने सोयीचे व कमी खर्चाचे असल्याने कल्याण, ठाणे, मुंबईकडून येणाऱ्या शिक्षकांची संख्या जास्त आहे. त्यातील बहुतांश शिक्षक वेळेचे बंधन पाळतात; परंतु जे लवकर पळतात त्यांच्यामुळे सर्वानाच दोष येतो. एकंदरीत शासनाने धोरण जाहीर केल्यास कर्जत बरोबरच जिल्ह्य़ातील शेकडो शाळा विद्यार्थ्यांच्या कमी पटामुळे बंद होतील.

‘शिक्षणाच्या अधिकारांतर्गत शासनाने १९ पट असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास शाळा बंद कराव्या लागतील. त्यामुळे त्या शिक्षकांचे काय करायचे ते शासनाकडूनच मार्गदर्शन होईल. मुख्याध्यापकांचे समायोजन पूर्ण झाले आहे. पदवीधर शिक्षकांच्या समायोजनाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. उपशिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे,’ असे कर्जतचे गट शिक्षणाधिकारी सुरेश डंबाये यांनी सांगितले.

‘शून्य विद्यार्थी पटाच्या शाळा बंद करायच्या की नाही ते शासनाने ठरवावे. मात्र एक विद्यार्थी असलेल्या शाळा बंद करू नये. त्या विद्यार्थ्यांला त्याच्या शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे,’ असे कर्जत पंचायत समितीचे उपसभापती मनोहर थोरवे यांनी सांगितले.