सततच्या आजारपणामुळे योग्य ठिकाणी बदली व्हावी, या मागणीसाठी जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसलेल्या सर्वशिक्षा अभियानातील विषयतज्ज्ञाच्या वृध्द आईचा बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास उपोषण मंडपातच मृत्यू झाला. वच्छलाबाई धर्माजी गेडाम (७०) असे वृध्द महिलेचे नाव आहे. गडचिरोली तालुक्यातील नगरी येथील मूळ रहिवासी असलेले प्रभाकर धर्माजी गेडाम (४०) हे सर्व शिक्षा अभियानांतर्गत सिरोंचा येथे विषयतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. अलिकडेच प्रभाकर गेडाम यांची बदली कोरची पंचायत समितीत करण्यात आली. मात्र, आपण सतत आजारी राहत असल्याने रस्त्यावरचे गाव द्यावे, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली, परंतु प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने गेल्या दोन दिवसांपासून ते वृध्द आईसह जिल्हा परिषदेसमोर उपोषणाला बसले होते. बुधवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अचानक त्यांच्या आईचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. वच्छलाबाईंचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे कळू शकले नाही. विशेष म्हणजे, उपोषण सुरू असतांना तेथे एकही पोलिस तैनात नव्हता, अशी चर्चा आहे.