औरंगाबाद : घरी पोळ्या बनविण्यासाठी येणाऱ्या सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या सत्तर वर्षांच्या ज्येष्ठ व्यक्तीस पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पोर्णिमा कर्णिक यांनी ठोठावली.

बीड बायपास रस्त्यावरील महुनगरात राहणारा रामराव मारोती म्हस्के याने स्टेशन परिसरात राहणाऱ्या सतरा वर्षीय मुलीस घरी पोळ्या करण्यासाठी बोलावले. ही मुलगी त्याच्या घरी नियमितपणे पोळ्यासाठी जात होती. ३० जुलै २०१६ रोजी पोळ्या करून संपल्यावर टी. व्ही. पाहात बसली असता म्हस्के तिच्या जवळ आला आणि तुला दोनशे रुपये देतो असे म्हणत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केले. मुलीने आरडा ओरड केल्यामुळे शेजारचे नागरिक धावत मदतीला आले. त्यांनी सातारा पोलीस ठाण्यात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अत्याचार करणाऱ्या रामराव म्हस्के यास ताब्यात घेतले. पीडितेच्या तक्रारीवरून म्हस्के विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक रवींद्र बागुल यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पोर्णिमा कर्णिक यांच्या समोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी आठ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. न्यायालयाने रामराव म्हस्के यास दोषी ठरवून वेगवेगळ्या कलमांनुसार शिक्षा सुनावली. दरम्यान, पीडितेच्या वयाचा प्रश्न न्यायालयात उपस्थित करण्यात आला. अल्पवयीन मुलीच्या वयाचा दाखला नव्हता, ती शाळेत जात नव्हती त्यामुळे तिचे वय सिध्द करण्यासाठी वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचे वय सतरा असल्याचे अहवालात म्हटले.