सांगली : पंजाबमधील अमृतसरहून ६९८ व्यक्ती सांगलीसह कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्य़ात गुरुवारी सकाळी पोहोचल्या. मध्यरात्री येणारी ही खास रेल्वे तब्बल आठ तास विलंबाने मिरज स्थानकामध्ये पोहचली. या प्रवाशांना रेल्वे स्थानकापासून गावी पोहोचण्यासाठी एसटी महामंडळाच्या ६० बसची व्यवस्था करण्यात आली होती.

सांगली जिल्ह्य़ातील विटा, खानापूर, पलूस तालुक्यासह सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोला, मंगळवेढा तालुक्यातील बहुसंख्य गलाई व्यावसायिक पंजाबमध्ये वास्तव्यास आहेत. या सर्वाना घेऊन खास रेल्वे अमृतसरहून सोडण्यात आली. पुणे आणि सातारा स्थानकावर काही प्रवाशांना सोडल्यानंतर ही गाडी गुरुवारी सकाळी नऊ वाजता मिरज स्थानकावर पोहोचली.

मिरजेत आल्यानंतर या प्रवाशांचे थर्मल स्क्रििनग करण्यात आले. प्रत्येक बसमध्ये २२ प्रवासी क्षमता ठेवण्यात आली होती. तत्पूर्वी काँग्रेसच्या वतीने राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या कार्यकर्त्यांकडून या प्रवाशांना अल्पोपाहार पाकिट, पाण्याची बाटली, मुखपट्टी, सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले. या प्रवाशांना एसटी बसने सोलापूर, कोल्हापूर, विटा, तासगाव, पलूस, खानापूर, आटपाडी आदी तालुक्याच्या ठिकाणी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी उप अधीक्षक संदीपसिंह गिल, महापालिका उपायुक्त स्मृती पाटील आदींसह एसटी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.